विद्यार्थ्यांना मिळाले क्रीडांगण---लोकमतचा दणका
By Admin | Updated: November 5, 2014 23:44 IST2014-11-05T21:27:05+5:302014-11-05T23:44:06+5:30
‘लोकमत’चे अभिनंदन : ट्रक पार्किंग केले हद्दपार

विद्यार्थ्यांना मिळाले क्रीडांगण---लोकमतचा दणका
सातारा : गुरुवार परजावरील पालिका शाळेत मुलांच्या क्रीडांगणाचे वाहन तळ झाल्याचे सचित्र वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर तातडीने हालचाली करत विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी हे क्रीडांगण मोकळे करून देण्यात आले आहे.
येथील गुरुवार परजावर नगरपालिकेच्या मराठी आणि ऊर्दू अशा दोन शाळा आहेत. शाळेचे वर्ग दुसऱ्या मजल्यावर भरतात. तर तळाला काही व्यावसायिकांचे दुकान गाळे आहेत. यामुळे येथे कायम वर्दळीचे वातावरण असते.
या शाळेत सरासरी शंभरहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी शिकतात. प्रशस्त इमारत आणि सुसज्ज क्रीडांगण असतानाही येथील विद्यार्थ्यांना वर्गाच्या चार भिंतीतच खेळावे लागत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ ने मंगळवार, दि. ४ नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आले होते.या वृत्ताची दखल घेत शाळा कमिटीने तातडीची बैठक घेऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित न ठेवण्याचा निर्णय घेत, ट्रक लावणाऱ्यांना याविषयी सूचना केल्या. शाळेच्या वेळेत या क्रीडांगणावर कोणीही वाहन न लावण्याचे आदेशही समितीच्या वतीने देण्यात आले आहेत. गुरुवार परज हा मौलाना आझाद मैदान म्हणून शाळेसाठी आरक्षित आहे, तरी सुुद्धा शाळेतील विद्यार्थ्यांना मैदानावर झालेल्या अतिक्रमणामुळे खेळापासून वंचित राहावे लागते. तसेच या मैदानावर विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात. शाळा, प्रार्थनास्थळ या मैदानालगतच असल्याने या मैदानचे पावित्र राखणे ही येथील रहिवाशांची आहे. यासाठी गाळेधारकांनी स्वछता ठेवण्यासाठी सूचना केल्या आहेत. तसेच हा मैदान बंदिस्त करण्यासाठी पालिकेने ही याबाबत सहकार्य करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
या परिसरात काही ट्रान्सपोर्ट आहेत. या सर्वांनी या क्रीडांगणाचा वापर गाड्या लावण्यासाठी केल्याने विद्यार्थ्यांची खेळण्याची ओरड झाली असल्याचे ‘लोकमत’ने प्रकाशात आणले होते. (प्रतिनिधी)
जबाबदारीची जाण ठेवावी !
विद्यार्थ्यांच्या खेळण्याच्या जागेवर ट्रक लावून त्यांची अडचण करणाऱ्या समाजातील या नागरिकांनी आपल्या जबाबदारीची जाण ठेवावी, अशी अपेक्षा सुज्ञ सातारकर व्यक्त करत आहेत. ट्रक उभे करायला स्वत:ची जागा अपुरी पडत असली तरीही विद्यार्थ्यांच्या हक्कावर गदा आणण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. भविष्यातही विद्यार्थ्यांसाठी म्हणून तरी त्यांनी या मैदानाचे वाहन तळ करू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
लहान मुलांना मुक्तपणे खेळता यावे, यासाठी असणारे क्रीडांगण पुन्हा एकदा गजबजणार आहे. ‘लोकमत’च्या वृत्तामुळे याला वाचा फुटली. भविष्यात येथे पार्किंग तसेच ट्रक उभे राहू न देण्याची खबरदारी आम्ही घेणार आहे. तसेच येथे कोणताही गैरप्रकार होऊ देणार नाही.
- मुक्तार पालकर
आमच्या मैदानावर गाड्या लावण्यात येत असल्यामुळे आम्हाला खेळायला जागा नव्हती. छोट्याशा वर्गात खेळायला येत नव्हतं. दिवाळी सुटीनंतरच्या पहिल्याच दिवशी मोकळ्या जागेवर खेळायला मिळाल्यामुळे मज्जा वाटली. खूप दिवसांनी मैदानावर खेळण्याचा आनंद मिळाला.
- नाझनिन इनामदार, विद्यार्थी