विद्यार्थ्यांना विषबाधा अनागोंदी कारभारामुळेच !
By Admin | Updated: April 7, 2016 00:03 IST2016-04-06T21:38:09+5:302016-04-07T00:03:48+5:30
पाडेगाव आश्रमशाळा : जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडून पाहणी; आरोग्याविषयी काळजी घेण्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना

विद्यार्थ्यांना विषबाधा अनागोंदी कारभारामुळेच !
लोणंद : पाडेगाव, ता. खंडाळा येथील समता आश्रम शाळेत मंगळवारी झालेल्या प्रकरणानंतर पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन शाळेतील यंत्रणेची पाहणी केली. विद्यार्थी वसतिगृहाची कमालीची दुरवस्था पिण्याच्या पाण्याच्या टाकीची अस्वच्छता, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा याबाबतचा अभाव जाणवल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. आश्रमशाळेच्या अनागोंदी कारभारामुळेच विद्यार्थ्यांची अशी दुर्दशा झाली असल्याचे निदर्शनास आणून संपूर्ण यंत्रणेचाच पोलखोल केला.समता आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दूषित पाणीपुरवठा झाल्याने जुलाब, उलट्या अशा त्रासाने ग्रासले. त्यानंतर त्यांना लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती डॉ. सुरेखा शेवाळे, खंडाळा सभापती नितीन भरगुडे-पाटील, पं. स. सदस्या अनिता शेळके, समाजकल्याण अधिकारी साळी, अन्न तपासणी निरीक्षक यू. एस. लोकरे, आरोग्य अधिकारी डॉ. संजय गायकवाड यांनी आरोग्य केंद्रास भेट देऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. मुलांच्या आरोग्याविषयी काळजी घेण्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानंतर पाडेगाव येथील आश्रमशाळेची पाहणी केली. स्वयंपाकगृहाची अस्वच्छता, धान्य ठेवण्याकडे केलेले दुर्लक्ष तसेच निकृष्ट दर्जाची डाळ वापरत असल्याचे निदर्शनास आले. ज्या टाकीतून मुलांना पाणीपुरवठा केला जातो. त्याची स्वच्छता नव्हती. टाकीला शेवाळ चढले होते. तर त्यात कोणतेही प्रमाण न घेता टीसीएल टाकण्यात आले.
या शाळेत ११०० विद्यार्थी आहेत. त्यापैकी ९०० विद्यार्थी वसतिगृहात राहतात. त्यांच्याकडे आवश्यक रितीने लक्ष दिले जात नसल्याचे निदर्शनास आल्याने सभापती सुरेखा शेवाळे यांनी अधिकाऱ्यांना याबाबतचा अहवाल देण्याच्या सूचना केल्या. (प्रतिनिधी)
पाण्याची परिस्थिती जैसे थे
वसतिगृहातील ३३ विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब झाले. त्यापैकी गंभीर प्रकृती असणाऱ्या मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी आणखी काही मुलांना तसाच त्रास सुरू झाला. त्यांनाही लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. या प्रकारानंतर वसतिगृहाच्या पाण्याची अवस्था जैसे थीच होती.
शाळेकडून नेहमी स्वच्छता राखली जाते. सध्या ग्रामपंचायतीचे नळकनेक्शन बंद असल्याने कुपनलिकेचे पाणी वापरावे लागत आहे. दूषित पाण्यामुळे पहिल्यांदाच असा प्रकार घडला असून यापुढे योग्य ती काळजी घेतली जाईल.
- पवन सूर्यवंशी, संचालक, आश्रमशाळा
विद्यार्थ्यांची विचारपूस
मुलावर उपचार सुरू असल्याचे समजताच भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, लोणंदमधील भाजपाचे नेते विनोद क्षीरसागर, लक्ष्मणराव शेळके, अभिजित खंडागळे यांनी मुलांची भेट घेऊन विचारपूस केली.