विद्यार्थी वाहतूक करणारी व्हॅन जळून खाक!
By Admin | Updated: March 12, 2016 00:08 IST2016-03-11T22:18:34+5:302016-03-12T00:08:08+5:30
सुदैवाने मुले बचावली : न्यू इंग्लिश स्कूलसमोर शेकडो नागरिकांनी वीस मिनिटे रोखून धरले श्वास

विद्यार्थी वाहतूक करणारी व्हॅन जळून खाक!
सातारा : विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या व्हॅनने शाळेसमोरच अचानक पेट घेतल्याने शाळकरी मुले आणि नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. व्हॅनचालक गाडी लॉक करून मुलांना आणण्यासाठी शाळेत गेला होता; त्यामुळे अनर्थ टळला. दरम्यान, वीस मिनिटांनी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने आग तातडीने आटोक्यात आणली.
ज्ञानेश्वर रामचंद्र ढमाळ (वय ३४, रा. गोळीबार मैदान, गोडोली, सातारा) यांची ही व्हॅन असून, विद्यार्थी वाहतुकीचा परवाना असलेली, ही व्हॅन (एमएच ११ टी ९८४१) आगीत पूर्णत: भस्मसात झाली. न्यू इंग्लिश स्कूल आणि नवीन मराठी शाळांमधील मुले या व्हॅनमधून ये-जा करीत असत. शुक्रवारी सायंकाळी चार वाजून चाळीस मिनिटांनी न्यू इंग्लिश स्कूल सुटली. याच दरम्यान नवीन मराठी शाळाही सुटली. त्यामुळे दोन्ही शाळांच्या मधील दक्षिणोत्तर रस्त्यावर मुले आणि पालकांची गर्दी होती. दरम्यान, पावणेपाचच्या सुमारास व्हॅनने पेट घेतल्याने पळापळ झाली.
नवीन मराठी शाळेच्या कुंपणभिंतीलगत ही व्हॅन उभी केली होती. शेजारीच विजेचा ट्रान्स्फॉर्मर आणि झाडे असल्यामुळे धोक्याची परिस्थिती निर्माण झाली होती. गोंधळलेल्या वातावरणात मुले आणि पालक असतानाच पेठेतील नागरिकांनी तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या इतर चालकांनी मुलांना व्हॅनपासून दूर नेले. व्हॅनपासून दोन्ही बाजूंना बघ्यांची प्रचंड गर्दी उसळली होती. काही जणांनी अग्निशमन दलाला आणि पोलिसांना फोन करून माहिती दिली. सुमारे वीस मिनिटांनी पालिकेच्या अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यापाठोपाठ पोलीस आणि वीजवितरण कंपनीचे कर्मचारीही पोहोचले. दहा-पंधरा मिनिटांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. (प्रतिनिधी)
स्फोटांसारखे आवाज अन काळजात चर्रर्र
व्हॅनला लागलेल्या आगीने काही क्षणांत रौद्ररूप धारण केले. व्हॅन जळत असताना कधी काच तडकत होती तर कधी एखादा टायर फुटत होता. त्यामुळे अधूनमधून स्फोटांसारखे आवाज येत होते आणि लहान मुलांसह नागरिकांच्या काळजात चर्रर्र होत होते. गॅसकिट असलेल्या या व्हॅनच्या मागील बाजूला असाच स्फोट होऊन जेव्हा आगीचा मोठा लोळ उठला, तेव्हा शेजारी असलेल्या उंच झाडालाही झळ लागली. सर्वांना चिंता होती ती ट्रान्स्फॉर्मरला झळ लागण्याची. तथापि, तसे काही घडण्यापूर्वीच अग्निशमन दल दाखल झाले.
स्वयंस्फूर्तीने आपत्ती व्यवस्थापन
मुलांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची जबाबदारी नागरिकांनी आणि इतर वाहनचालकांनी स्वयंस्फूर्तीने पार पाडली. यात न्यू इंग्लिश स्कूलमधील शिक्षकांचाही समावेश होता. घटनेची माहिती नवीन मराठी शाळेत समजताच जी मुले शाळेतच होती, त्यांना उत्तरेकडील दरवाज्याने बाहेर नेण्यात आले, तर न्यू इंग्लिश स्कूलमधील मुलांना नागरिक दक्षिणेकडे घेऊन गेले.
प्रयत्न अपुरे
न्यू इंग्लिश स्कूलमधील दोन आगनियंत्रक उपकरणे घेऊन शाळेचे शिक्षक व कर्मचारी घटनास्थळी धावले; मात्र ही उपकरणे आगीच्या तुलनेत खूप लहान होती. शिवाय, ती चालविण्याचा अनुभव नसल्याने प्रयत्न तोकडे पडत होते. आसपास पाण्याचा मोठा साठा नसल्याने तसेच व्हॅनमधून स्फोटांसारखे आवाज येत असल्याने नागरिकांच्या प्रयत्नांवर मर्यादा आल्या.
मुलांना रडू कोसळले
विद्यार्थ्यांची ने-आण करणारी व्हॅन जळताना पाहून काही विद्यार्थ्यांना रडू कोसळले. ज्ञानेश्वर ढमाळ हे गेली १२ ते १३ वर्षे हा व्यवसाय करीत आहेत. अचानक लागलेल्या आगीने तेही पुरते भेदरून गेले.
घटनाक्रम
४.४० : न्यू इंग्लिश स्कूल आणि नवीन मराठी शाळा सुटली
४.४५ : शाळेबाहेर व्हॅनने पेट घेतला
५.०२ : व्हॅनच्या मागील बाजूला स्फोटासारखा मोठा आवाज
५.०६ : अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी
५.१८ : आगीवर पूर्ण नियंत्रण