एसटीची कंट्रोल केबिन झाली अबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:38 IST2021-05-23T04:38:20+5:302021-05-23T04:38:20+5:30
राज्य परिवहन महामंडळाचे बसस्थानक नेहमी गजबजलेले असते. सातारा मध्यवर्ती बसस्थानकात दररोज सरासरी दोन हजारांच्या घरात गाड्यांची ये-जा असते. गाड्यांची ...

एसटीची कंट्रोल केबिन झाली अबोल
राज्य परिवहन महामंडळाचे बसस्थानक नेहमी गजबजलेले असते. सातारा मध्यवर्ती बसस्थानकात दररोज सरासरी दोन हजारांच्या घरात गाड्यांची ये-जा असते. गाड्यांची नोंद करणे, कोणती गाडी कोठे लागली आहे, याची प्रवाशांना माहिती व्हावी यासाठी सातत्याने उद्घोषणा केली जाते. यामुळे वाहतूक नियंत्रण कक्षामध्ये चोवीस तास गडबड गोंगाट सुरू असतो.
कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर दुसऱ्या लाटेत गेल्या महिनाभरापासून एसटीची सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी नियंत्रण कक्षात सर्वत्र शांतता पहायला मिळते. या ठिकाणावरून अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांची ने-आण केली जाते. त्यामुळे साताऱ्यातून बाहेर जाणाऱ्या तसेच बाहेरील विभागातून पुढे मार्गस्थ होणाऱ्या दररोज सरासरी २० ते २५ गाड्या सातारा बसस्थानकात येत असतात. या गाड्यांची नोंद वाहतूक नियंत्रण कक्षात केली जाते. त्याचप्रमाणे सातारा एसटी महामंडळातील काही चालक पोलीस गाड्या तसेच ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या टँकरवर कर्तव्य बजावत आहेत. या वाहकांची ही नोंद वाहतूक निघताना करावी लागते. त्याचप्रमाणे दररोज दहा-पंधरा जणांच्या डोळ्यांची तपासणी होते. दिवसा कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक नियंत्रकांना फारसा छंद जोपासता येत नसला तरी रात्री ड्युटीतील कर्मचारी मात्र रिकामेच असतात.
हे कर्मचारी रात्री सोशल मीडियावर आढावा घेतात. मोबाईलवर गाणी ऐकत बसले किंवा पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या आरोग्याची चौकशी करत असतात. कारण एसटीतील सर्वात हीच मंडळी बिझी असतात. त्यांना एकमेकांची विचारपूस करायला वेळ मिळत नाही. हीच संधी असल्याने हे आपले नातेसंबंध जपण्यासाठी वेळेचा वापर करीत असतात.
- जगदीश कोष्टी
चौकट
राम नामाचा जप
काही वाहतूक नियंत्रक हे धार्मिक स्वभावाचे असल्याने या काळात एक वही आणून त्यावर राम नामाचा जप श्रीराम जय राम जय जय राम अशाप्रकारे सातत्याने लिहून आपला वेळ घालवित शांती मिळवित असतात.
कोट
बसस्थानकात दिवसभर कोणी ना कोणी येत असते. मात्र, रात्री कोणीही फिरकत नाही. त्यामुळे वेळच जात नाही. वेळ घालविण्यासाठी मोबाईलवर जुनी गाणी लावून ऐकत बसत असतो.
- चंद्रकांत चव्हाण,
वाहतूक नियंत्रक सातारा.