जिल्ह्यात २५ मे पासून कडक लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:40 IST2021-05-23T04:40:11+5:302021-05-23T04:40:11+5:30
सातारा : कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यामध्ये २५ मेपासून १ जूनच्या सकाळी ७ ...

जिल्ह्यात २५ मे पासून कडक लॉकडाऊन
सातारा : कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यामध्ये २५ मेपासून १ जूनच्या सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊनचे आदेश काढले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड मोठी वाढ झालेली आहे. प्रशासनाने १४ एप्रिल रोजी लॉकडाऊनचे आदेश दिले. त्याला मुदतवाढदेखील देण्यात आली. या आदेशाला आता १ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मागील आदेशानुसार किराणा साहित्य तसेच रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ घरपोच देण्यास परवानगी दिली होती. मात्र, आता यावर देखील बंदी घालण्यात आलेली आहे. कोरोनाची साखळी तोडण्याच्या अनुषंगाने प्रशासनाने हे कठोर पाऊल उचलले आहे. आंतरजिल्हा वाहतूक ही केवळ अत्यावश्यक सेवेसाठी काम करणारे लोक, वैद्यकीय सेवा, अंत्यसंस्कार किंवा कुटुंबातील व्यक्ती गंभीर आजारी असल्यासच परवानगी दिली जाणार आहे. या निर्बंधांचे भंग करणाऱ्यांवर १० हजार रुपये इतक्या दंडाची कारवाई केली जाणार आहे.
काय सुरू राहील...
रुग्णालये, निदान केंद्रे, दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध कंपन्या व दुकाने, वाहतूक व पुरवठा साखळी, प्राण्यांवर उपचार करणारी रुग्णालये, ॲनिमल केअर शेल्टर्स, पेट शॉप्स, दूध संकलन केंद्रे सकाळी ७ ते ९, घरपोच दूध वितरणाला परवानगी शेती बियाणे, खते, शेती विषयक उपकरणे व त्यांची दुरुस्ती व देखभाल सेवा दुकाने (सकाळी ७ ते सायंकाळी ५ यावेळेत), शिवभोजन थाळी योजना केवळ पार्सल सेवा, शीतगृहे व गोदाम सेवा, स्थानिक प्राधिकरणांचे मान्सूनपूर्व उपक्रम, स्थानिक प्राधिकरणांच्या सर्व सार्वजनिक सेवा, सेबी मान्यताप्राप्त कार्यालये उदा. स्टॉक एक्सचेंज, डिपॉजिट व क्लिअरिंग कार्पोरेशनकडे नोंदणीकृत एजंट, टेलिकाॅम सेवेतील दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवा, वस्तू व माल वाहतूक, पाणी पुरवठा सेवा, ई व्यापार, प्रसारमाध्यमे, अत्यावश्यक सेवेला पुरवठा करण्यासाठी पेट्रोल पंप सुरू ठेवण्यात येतील, शासकीय व खासगी सुरक्षा सेवा, विद्युत व गॅस पुरवठा सेवा, टेलिफोन सेवा, एटीएम, टपाल सेवा, अत्यावश्यक सेवेसाठी रिक्षा, टॅक्सी मर्यादित आसनक्षमतेत सुरू राहतील
या बाबींना पूर्णपणे बंदी
व्यापारी दुकाने व इतर सर्व दुकाने व आस्थापना, उपहागृहे, बार, लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट भाजी मार्केट, फळ मार्केट, आठवडी व दैनंदिन बाजार, मंडई, फेरीवाले, वाईन शॉप, बिअर शॉपी, देशी दारू दुकाने व तत्सम आस्थापना, मटण, चिकन, अंडी, मासे इ. विक्रीवर बंदी, सर्व किराणा दुकाने, ठोक विक्रेते, इतर सर्व दुकान, कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत सर्व व्यवहार, सर्व भाजीपाला, बेकरी, फळ विक्रेते, वाहन दुरुस्ती गॅरेज, वाहनांच्या स्पेअर पार्टची दुकाने, रिझर्व्ह बँकेने विहित केलेल्या सर्व सेवा, खासगी, सहकारी बँका व सर्व सहकारी, सार्वजनिक उपक्रम, वित्तीय बाजार, नॉन बँकिंग वित्तीय महामंडळे, सूक्ष्म वित्तीय संस्था, बांधकामे राज्य परिवहन महामंडळाची जिल्ह्यांतर्गत वाहतूक सेवा
चौकट
जिल्ह्यात ३१ कोरोना बाधितांचा मृत्यू
चौकट..
सातारा जिल्ह्यात शनिवारी १८७८ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ३१ बाधितांचा मृत्यु झाला. तपासणीच्या तुलनेत कोरोना बाधित सापडण्याचा दर दहा टक्क्यांनी कमी झाल्याने दिलासा मिळाला असला तरी मृत्युचे सत्र कायम असल्याने चिंतेचे वातावरण आहे.
चौकट..
कोरोना पश्चात होणाऱ्या म्युकरमाकोसिस व्याधीग्रस्त रुग्ण सातारा जिल्ह्यात आढळू लागले आहेत. जिल्ह्यातील २८ रुग्ण या आजाराने बाधित आढळले तर तीन जणांचा उपचार घेताना मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये म्युकरमाकोसिस रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड सुरू करण्यात आला आहे.