नियमांचे काटेकोर पालन करणे हाच एकमेव उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:35 IST2021-04-05T04:35:23+5:302021-04-05T04:35:23+5:30

वडूज : लॉकडाऊन करायचा की नाही याचा निर्णय घ्यायच्या उंबरठ्यावर राज्य सरकार आहे. राज्यात वाढत चाललेली कोरोनाची आकडेवारी आणि ...

Strict adherence to the rules is the only solution | नियमांचे काटेकोर पालन करणे हाच एकमेव उपाय

नियमांचे काटेकोर पालन करणे हाच एकमेव उपाय

वडूज : लॉकडाऊन करायचा की नाही याचा निर्णय घ्यायच्या उंबरठ्यावर राज्य सरकार आहे. राज्यात वाढत चाललेली कोरोनाची आकडेवारी आणि जनतेचा हलगर्जीपणा यामुळे सरकारने लॉकडाऊन जाहीर केला तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नसावे; पण वर्ष झाले तरी कोरोनाचे युद्ध संपलेले नाही. मध्यंतरी ते संपल्यासारखे वाटू लागले असताना आणि लसही हातात आली असताना दिलासा देणारी स्थिती निर्माण झाली होती. सध्या एकमेव पर्याय म्हणजे नियमांचे काटेकोर पालन करणे हेच त्रिवार सत्य आहे.

कोरोनावर लस आली हाच तो काय मागील वर्षात मिळालेला दिलासा; मात्र आताही परिस्थिती हाताबाहेर जात आहे. सरकार, प्रशासन आणि रुग्णालये, तेथील कर्मचारी त्यांचे काम तेव्हाही करीत होते, आजही करीत आहेत व कोरोनाचा नायनाट होईपर्यंत त्यांना ते करावेच लागणार आहे. त्यातून त्यांना उसंत मिळणार नाही अशीच स्थिती आहे. इतर देशांतील बातम्यांचा आढावा घेतला तर निर्बंध उठविल्यानंतर ढिलेपणामुळे पुन्हा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वेळ आली आहे. जगातील इतर देशाबरोबरीने महाराष्ट्रातील रुग्ण संख्या जवळपास पोहोचली आहे. कोरोनाला हरवायचे असेल तर नियमांचे काटेकोर पालन करणे हाच एकमेव उपाय आहे. आताही गत तीन महिन्यांपासून रुग्णसंख्येत वाढ होण्यास सुरुवात दिसू लागली होती. फेब्रुवारीत ते प्रमाण आणखी वाढले. मार्चमध्ये तर हाताबाहेर गेले आणि आता एप्रिलमध्ये पुन्हा गेल्या वेळेपेक्षाही भयावह अशी स्थिती निर्माण झाली आहे.

काही महिन्यांपूर्वीच खटाव तालुक्यातील ९० ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकाही झाल्यात. त्यात कोरोनाची सगळी आचारसंहिता खुंटीला टांगून ठेवण्यात आली होती. या काळात सार्वजनिक वाहने, सार्वजनिक ठिकाणे, हॉटेल्स, बार एवढेच नव्हे, तर चौक आणि मुख्य बाजारपेठांचे रस्ते सगळेच गजबजलेले होते. आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी असणारा मास्क तर गायबच झाला होता. सोशल डिस्टन्स कधीच गुंडाळून ठेवलेले. ज्यांना लक्षणे दिसत होती किमान त्यांनी तरी खबरदारी घेत इतरांपासून लांब राहणे आवश्‍यक होते. त्यांनीही आपली लक्षणे आणि आपल्या घरात कोणीतरी पॉझिटिव्ह सापडला आहे. या बाबी लपविण्यातच धन्यता मानली. कोरोना म्हणजे साधा सर्दी, खोकला झाला आहे. या नव्या ज्ञानाची भर टाकणारेही महाभाग आजूबाजूला होतेच. त्यामुळे विषाणूची खिरापत सगळीकडे वाटत ठेवली गेली.

चौकट..

स्वतःची आणि कुटुंबाची जबाबदारी स्वीकारा...

जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या मार्गावर आहे. रोज पाचशेच्या आसपास रुग्ण वाढत आहेत. ग्रामीण भागात रुग्ण वाढले तर परिस्थिती काय होते हे आपण सगळ्यांनीच अनुभवले आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता सगळ्यांनीच तारतम्याने वागून स्वतःची आणि कुटुंबाची जबाबदारी स्वीकारून नियमांचे काटेकोरपणे पालन केले तरच कोरोनाला आपल्यापासून आणि आपल्या कुटुंबापासून दूर ठेवण्यात आपण यशस्वी होऊ शकू हा दृढ विश्वास सर्वांच्या मनात रुजणे काळाची गरज बनली आहे.

Web Title: Strict adherence to the rules is the only solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.