दफनविधीच्या कारणावरून तणाव
By Admin | Updated: June 10, 2016 00:13 IST2016-06-09T22:46:02+5:302016-06-10T00:13:03+5:30
मलकापुरात पोलिस बंदोबस्त : जागेवरून वाद; पाहणी करण्याच्या प्रांताधिकाऱ्यांकडून सूचना

दफनविधीच्या कारणावरून तणाव
कऱ्हाड : मलकापूर येथील बिरोबा मंदिराची सेवा करणाऱ्या पुजाऱ्यांचे मंगळवारी निधन झाल्यानंतर
मंदिर परिसरात पार्थिवाचा दफनविधी करण्याच्या कारणावरून तणाव निर्माण झाला. कृष्णा ट्रस्टने
संबंधित जागेत विधी करण्यास विरोध दर्शविल्याने धनगर समाज आक्रमक झाला होता. अनुचित प्रकार घडू
नये यासाठी त्याठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.मलकापूर येथे कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या आवारात २० गुंठे जागेमध्ये बिरोबा मंदिर असून, मंदिराची सेवा करणाऱ्या पुजाऱ्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव याच जागेत दफन करण्याची परंपरा आहे. मंगळवारी जखिणवाडी येथील तातोबा येडगे (वय ६५) या पुजाऱ्यांचे निधन झाले. त्यामुळे परंपरेनुसार त्यांचे पार्थिव मंदिराच्या आवारातील जागेत दफन करण्याचा निर्णय धनगर समाजाने घेतला. मात्र, कृष्णा ट्रस्टच्या व्यवस्थापनाने त्यांना विरोध केला. या विरोधामुळे नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला.प्रांताधिकारी किशोर पवार यांची भेट घेतली. याबाबत प्रांताधिकाऱ्यांनी तहसीलदार व मंडलाधिकाऱ्यांना संबंधित जागेची पाहणी करून अहवाल देण्याच्या सूचना दिल्या. दुपारी साडेतीन वाजता मंडलाधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली. सायंकाळपर्यंत धनगर समाजाचे नागरिक मंदिर परिसरात निर्णयाची वाट पाहत होते. मात्र, कोणताच निर्णय न झाल्याने संतप्त झालेल्या जमावाने प्रशासनाला दहा मिनिटांचा वेळ देऊन निर्णय न झाल्यास पार्थिव मंदिर परिसरात आणून दफन करण्याचा इशारा दिला. त्यानुसार जमाव पार्थिव आणण्यासाठी जखिणवाडीकडे गेला. याच कालावधीत कृष्णा ट्रस्टच्या व्यवस्थापनाची बैठक होऊन सायंकाळी प्रशासनाने समाजातील लोकांना फोनवरून तोंडी परवानगी दिली. त्यामुळे तणाव निवळला. अनुचित प्रकार घडू नये यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास धस, सहायक निरीक्षक एच. एन. काकंडकी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मंदिर परिसरात तैनात होते. (प्रतिनिधी)