आठवडा बाजाराने गुदमरतोय वाईतील रस्त्यांचा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:33 IST2021-02-08T04:33:48+5:302021-02-08T04:33:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाई : वाई शहरात दर सोमवारी भरणारा आठवडा बाजार सध्या अनेकांची डोकेदुखी ठरू लागला आहे. ...

आठवडा बाजाराने गुदमरतोय वाईतील रस्त्यांचा श्वास
लोकमत न्यूज नेटवर्क
वाई : वाई शहरात दर सोमवारी भरणारा आठवडा बाजार सध्या अनेकांची डोकेदुखी ठरू लागला आहे. शहरातील रस्ते मुळातच अरुंद आहेत. अशा परिस्थितीत या बाजारामुळे रस्त्यांचा श्वास मात्र गुदमरू लागला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही परिस्थिती कायम असून, प्रशासन कायमस्वरूपी मंडई उभारणार कधी, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
वाईसह परिसरातील गावे व वाड्या-वस्त्यांची वाई ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांची या ठिकाणी खरेदी-विक्रीसाठी सतत रेलचेल सुरू असते. शहरात एक मंडई असली तरी ती आठवडा बाजारासाठी सोयीची नाही. जागा अपुरी पडत असल्याने शहराचा आठवडा बाजार गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावरच भरत आहे.
वाई शहरातील चहूबाजूचे रस्ते अरुंद आहेत. याच ठिकाणी नगरपालिका, विविध बँकांची कार्यालये, कपड्याची दुकाने यांसह अनेक दुकाने आहेत. दैनंदिन मंडईसह आठवडा बाजारही याच ठिकाणी भरत असल्याने नागरिकांची तसेच वाहनधारकांची अक्षरश: दमछाक होते. या दिवशी मोबाइल व पाकीटमारांचादेखील सुळसुळाट असतो.
(चौकट)
शहरातील रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या नेहमीच भेडसावत असते. रस्त्यावरील भाजी व फळ विक्रेत्यांमुळे यात अधिकच भर पडते. रस्त्यावर भरणारा आठवडा बाजार विक्रेते व ग्राहकांना सोयीचा वाटत आहे. मात्र, कुठेतरी हे चित्र बदलायला हवे. प्रशासनाने सर्व विक्रेते एकाच छताखाली कसे येतील यादृष्टीने विचार करावा.
- प्रा. सुधाकर शिंदे, वाई
(चौकट)
या ठिकाणी होऊ शकते व्यवस्था
तहसील कार्यालयाच्या उजव्या बाजूस, शिवाजी चौकातून बसस्थानकाच्या दिशेला जाणाऱ्या रस्त्याजवळ पालिकेच्या मोकळ्या जागा आहेत. या ठिकाणी नवी भाजी मंडई केल्यास मंडईतील कोंडी फुटेल. पालिकेचे या जागेवरच भाजी मंडई उभारण्याचे नियोजन आहे.
फोटो : ०७ पांडुरंग भिलारे
वाई शहरातील मध्यवर्ती ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून अशा प्रकारे आठवडा बाजार भरत आहे.