गावोगावच्या रस्त्यांवर फिरतं डान्स बार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2015 23:55 IST2015-04-15T21:39:19+5:302015-04-15T23:55:13+5:30
नियमांची पालयमल्ली : मद्यप्राशन केलेल्या तरुणांचा डीजेच्या तालावर धिंगाणा; ध्वनिप्रदूषणानं बसताहेत सामान्यांच्या कानठळया

गावोगावच्या रस्त्यांवर फिरतं डान्स बार!
परळी : राज्य शासनाने एका बाजूला डान्सबारला बंदी घातली आहे. मात्र, सातारा तालुक्यातील ग्रामीण भागात परळी खोऱ्यात विविध सण, समारंभ यात्रांच्या निमित्ताने वाजविण्यात येणाऱ्या डॉल्बी ध्वनीच्या तालावर मद्यप्राशन केलेल्या तरुणाईचा ‘फिरता डान्स बार’ कायद्याच्या कोणत्या चौकटीत बसतो, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अमर्यादित डेसिबल आवाजाची ‘डॉल्बी’ सारे नियम धुडकावून ठिकठिकाणी जनसामान्यांना वेठीस धरत आहे.
सध्या सर्वत्र वाढदिवसांपासून ते विविध प्रकारचे सण, उत्सव, समारंभ, यात्रा मिरवणूक, विजयोत्सव अशा अनेक विविध प्रकारच्या कार्यक्रमांमधून लक्षवेधी अशी कमालीचे ध्वनिप्रदूषण करणारी डॉल्बी सिस्टीम सध्या सर्रास वापरली जात आहे. ठेक्यावरची गाणी मद्यप्राशन केलेली तरुणाई तालावर; पण विभत्स वेडीवाकडी नृत्य करणारी युवा पिढी वाढविलेला डॉल्बीचा आवाज आजूबाजूंच्या खिडक्या, दारे अशा हलक्या वस्तू ते अगदी भिंतीपर्यंत आवाजाने वाढणारी घरघर असे दृष्य सर्रास परळी खोऱ्यासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी दिसत आहे.
राज्य शासनाने सर्व ठिकाणचे चौकटीच्या आतले सर्व ‘डान्स बार’ बंद केले आहेत. डान्सबार बंदी झाली आणि आता त्या डान्स बारमधून बाहेर पडलेल्या काही तरुणी गावोगावच्या यात्रामधून कार्यक्रमातून तरुणांना खुणवत उघड्यावर नाचगाणी सादर करत आहेत.
डॉल्बीच्या तालावर मद्याचा डोस घेतलेली युवा पिढी रात्री उशिरापर्यंत विभत्स नृत्य करत आहेत. ना डॉल्बीच्या आवाजावर ना युवा पिढीच्या या वर्तणुकीवर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही.
जनसामान्य मात्र मोठ्या कर्णकर्कशऽऽ व हुद्याची धडपड वाढेपर्यंतच्या आवाजाने त्रासून गेले आहेत. काही ठिकाणी बारबाला नसतात; पण डॉल्बीच्या अमर्याद भन्नाट आवाजावर ‘टाकून’ असणारी अश्लील हावभाव करणारी, नृत्याचा-तालसुरांचा कुठेही लवलेश नसणारी तरुणाई पाहून समाजाचे देशाचे भावी आधारस्तंभ हेच का? असा प्रश्न समाजातील जाणकरांमधून उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)
पुढे बारबाला मागे टाकाऊ तरुणाई
सध्या परळी खोऱ्यासह इतर ठिकाणी यात्रा-जत्रांच्या व लग्नानंतरच्या रात्रीच्या वरातीत बारबाला आणल्या जात आहेत. असाच प्रकार परळी भागात घडला असून, याची सर्वत्र चर्चा होत आहे. डॉल्बी, बारबाला अन् टाकून असणारी टाकाऊ तरुणाई समाजस्वास्थ्य बिघडून टाकत आहे. आक्रमक युवा पिढीपुढे बोलायचे कोणी आणि पोलीस अथवा सक्षम यंत्रणादेखील या विषयावर मूग गिळून कशी गप्प बसते, यावर प्रश्न उपस्थित होत आहे.
कायद्याचे होतेच उल्लंघन
वास्तविक कायद्याप्रमाणे औद्योगिक क्षेत्रासाठी दिवसा ७५ डेसिबल व रात्री ७०, वाणिज्य क्षेत्रासाठी ६५ व ५५ निवासी क्षेत्रासाठी ५५ व ४५ आणि शांतता झोनमध्ये दिवसा ५० व रात्री ४० डेसिबल अशी ध्वनिमर्यादा सक्तीची असली तरी निवासी व शांतता क्षेत्रांमध्ये या मर्यादेचे उल्लंघन होत असल्याची वारंवार तक्रारी होत आहेत.