तटभिंत फोडून एसटी रस्त्यावर!
By Admin | Updated: May 22, 2015 00:21 IST2015-05-21T21:57:56+5:302015-05-22T00:21:54+5:30
६५ हजारांचे नुकसान : ब्रेक निकामी असल्याचे लक्षात न आल्याने दुर्घटना; जीवितहानी टळली

तटभिंत फोडून एसटी रस्त्यावर!
सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा आगारात बुधवारी रात्री ब्रेकचे काम करण्यासाठी उभी केलेली गाडी एका चालकाने सुरू केली. त्यानंतर गाडीवर नियंत्रण मिळविता न आल्याने संबंधित गाडी तटभिंत फोडून रस्त्यावर आली. यामध्ये सुमारे साठ ते पासष्ठ हजारांचे नुकसान झाले. हा अपघात गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास झाला.
याबाबत माहिती अशी की, मुंबई-सातारा ही निमआराम एसटी (एमएच ०७ सी ९०३६)चे ब्रेक निकामी झाले होते. त्यामुळे या गाडीचे काम करण्यासाठी गाडीच्या ब्रेकचे सुटे भाग काढून ठेवले होते. याचवेळी दुसरी बस तेथे आली. त्या गाडीच्या चालकाने स्वत:ची गाडी पुढे नेण्यासाठी नादुरुस्त गाडी सुरू करून पुढे नेली. सुरू झालेली गाडी थांबविता न आल्याने संबंधित चालकाने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या दिशेला असलेल्या तटभिंतीला नेऊन धडकवली.
त्यानंतर संबंधित गाडी तटभिंत फोडून रस्त्यावर आली. यामध्ये नळ, वीजजोडणी तसेच एसटीचे मिळून सुमारे ६५ हजारांचे नुकसान झाले. (प्रतिनिधी)
अनर्थ टळला
सातारा मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाजूने जाणारा रस्ता नेहमी रहदारीचा असतो. याच मार्गावर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आहे. यामध्ये शासनाच्या विविध विभागांचे कार्यालय, एसटीचे विभागीय कार्यालय, जिल्हा रुग्णालयाकडे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर केला जातो. हा अपघात सकाळी साडेआठच्या सुमारास झाला त्यावेळी रस्ता शांत असल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना दुपारी घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता.