आधी रणनीती सरदारांची; नंतर तयारी रणांगणाची...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:09 IST2021-02-05T09:09:31+5:302021-02-05T09:09:31+5:30
नितीन काळेल लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्हा परिषदेतील काही सभापती बदलाच्या हालचाली जोरात सुरू असून, राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील प्रमुख ...

आधी रणनीती सरदारांची; नंतर तयारी रणांगणाची...
नितीन काळेल
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हा परिषदेतील काही सभापती बदलाच्या हालचाली जोरात सुरू असून, राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक मुंबईत होणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. त्यामुळे मुंबईतील रणनीतीनंतर साताऱ्यात येऊन रणांगणाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे सभापतींची लवकरच खांदेपालट होऊ शकते.
२०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या. त्यामुळे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. पुढीलवर्षी जानेवारी महिन्यात जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील काही सदस्यांनी सभापतिपद मिळावे म्हणून देव पाण्यात घातले आहेत. कारण, पहिल्या अडीच वर्षांचा कार्यकाल संपल्यानंतर मागीलवर्षी जानेवारी महिन्यात अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली. त्यानंतर ९ जानेवारीला सभापतींची निवड झाली होती. सभापतींची निवड होण्यापूर्वी साताऱ्यातील झेडपी अध्यक्षांच्या बंगल्यावर राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत सभापतिपदाचे दावेदार मागे पडले आणि अनपेक्षितपणे काही नावे समोर आली.
अर्थ व शिक्षण समिती सभापतिपदी मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापतिपदी मंगेश धुमाळ, समाजकल्याण सभापती म्हणून कल्पना खाडे आणि महिला व बालकल्याणच्या सभापतिपदी सोनाली पोळ यांचे नावे जाहीर करण्यात आले. पण, त्याचवेळी राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी एक वर्षासाठी पदे असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यावेळी नाराज झालेले दावेदार वर्ष कधी संपते याची वाट पाहत होते. आता वर्ष पूर्ण झाल्याने पुन्हा त्यांनी तयारी सुरू केली. त्यासाठी नेत्यांच्या भेटींचा सपाटाच लावला आहे.
नवीन घडामोडीत मानसिंगराव जगदाळे हे सभापतिपदावर कायम राहण्याची शक्यता आहे, तर कृषी आणि समाजकल्याणसाठी बापूराव जाधव, धैर्यशील अनपट, डॉ. अभय तावरे हे पुन्हा चर्चेत आले आहेत. तसेच महिला व बालकल्याणसाठीही डॉ. भारती पोळ, दीपाली साळुंखे, अर्चना रांजणे यांची नावे आघाडीवर आहेत. डॉ. पोळ यांच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांकडे सभापतिपदाबाबत मागणी केल्याचीही माहिती मिळत आहे. सध्या राजकीय घडामोडी वेगाने वाढू लागल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.
चौकट :
बारामतीकरांचा सल्ला आवश्यकच...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष किंवा सभापतिपदाबाबत निर्णय घेताना बारामतीचा सल्ला घ्यावा लागतोच. विशेष करून उपमुख्यमंत्री अजित पवार हे यामध्ये लक्ष घालतात. त्यानंतर पुढील सूत्रे हलतात. आताही सभापती बदलाबाबत रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे व जिल्ह्यातील अन्य काही राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत बैठक होत असल्याची माहिती मिळत आहे. ही बैठक मंगळवार किंवा बुधवारी होऊ शकते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून सर्व कार्यवृत्तांत त्यांच्या कानावर घालण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील राजकीय दिशा ठरविण्यात येणार आहे, असे सांगण्यात येत आहे.
...................................................................