माशांसाठी गळ टाकला; पण हाती लागले बॉम्ब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:41 IST2021-05-18T04:41:43+5:302021-05-18T04:41:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कऱ्हाड : नदीत माशासाठी गळ टाकतात. त्या तिघांनीही माशासाठीच गळ टाकलेला; पण गळाला माशांऐवजी चक्क बॉम्ब ...

माशांसाठी गळ टाकला; पण हाती लागले बॉम्ब!
लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड : नदीत माशासाठी गळ टाकतात. त्या तिघांनीही माशासाठीच गळ टाकलेला; पण गळाला माशांऐवजी चक्क बॉम्ब लागले आणि तिघांची भंबेरी उडाली. आजवर टीव्हीत पाहिलेला बॉम्ब चक्क हातात आला. फुटतोय की काय, असंच त्यांना क्षणभर वाटलं. त्यांनी पोलिसांना कळवलं. पोलीस तातडीने तेथे पोहोचले आणि खरेखुरे बॉम्ब पाहून क्षणभर तेही थबकले.
कऱ्हाड तालुक्यातील तांबवे गावात सोमवारी दुपारी बॉम्ब आढळल्याने जिल्हा हादरला. सैन्यदलात वापरले जाणारे बॉम्ब नदीत आलेच कसे, हा प्रश्न अनेकांना पडला; पण त्याचं उत्तर काळाच्या उदरात दडलय. पोलीस तपासातून ते उत्तर कदाचित उघड होईलही. मात्र, या बॉम्बने चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.
साकुर्डीतील संभाजी चव्हाण, अरूण मदने, योगेश जाधव हे तिघेजण दररोज मासे पकडायला तांबव्याच्या हद्दीतील जुन्या पुलावर जातात. सोमवारी सकाळीही ९ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे ते तेथे गेले. जुन्या पुलावरून त्यांनी नदीत गळ टाकले. त्यानंतर दोन तास वाट पाहिली. गळाला मासा लागला असेल, असे समजून अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांनी गळ बाहेर काढला. मात्र, गळाला मासा लागला नव्हता. तिघेही हताश झाले खरे; पण माशाऐवजी जी वस्तू त्यांच्या गळाला लागली ती पाहून तिघांच्या पायाखालची जमीनच सरकली. संभाजीने टाकलेल्या गळाला एक प्लास्टिकची पिशवी अडकली होती. एरव्ही असा कचरा नेहमीच गळात अडकतो; पण ती पिशवी वेगळी होती. पिशवीचं तोंड गाठ मारून घट्ट बंद केलेलं. संभाजीची उत्सुकता वाढली आणि त्याने ती गाठ सोडली. बॉम्बसारखं काहीतरी त्याला दिसलं. उत्सुकतेतून त्याने ते हातातही घेतलं आणि तो हादरलाच. टीव्हीवर जसा पाहिला तस्साच बॉम्ब त्याच्या हातात होता. लगबगीने त्याने ती पिशवी सुरक्षित बाजूला ठेवली आणि पोलिसांना याची माहिती दिली.
दरम्यान, घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलीसही अवाक् झाले. खरेखुरे बॉम्ब नदीत कसे काय, असा प्रश्न त्यांनाही पडला. दहशतवादविरोधी पथक आणि बॉम्बशोधक पथक त्याठिकाणी पोहोचल्यानंतर पुढील कार्यवाही सुरू झाली. बॉम्ब निष्क्रीय करण्याच्या हालचाली त्यांनी सुरू केल्या.
- चौकट
आधी वाटलं खेळणं; पण...
संभाजीच्या हातात आलेला बॉम्ब सुरूवातीला त्याला खेळण्यासारखा वाटला. प्लास्टिकचं खेळणं असावं म्हणून त्याने त्याला उलथपालथं करून पाहिलंही; पण बॉम्बची लोखंडी पीन आणि त्यावर चढलेला गंज पाहून त्याला तो खराखुरा बॉम्ब असल्याची खात्री झाली.
- कोट (१७ संभाजी चव्हाण)
सैन्य दलात वापरले जाणारे बॉम्ब मी टीव्हीवर अनेकवेळा पाहिलेत. वेगवेगळ्या चित्रपटात बॉम्ब फेकताना दाखवलं जातं. मला सापडलेला बॉम्बही दिसायला तसाच होता. मला शंका वाटली, म्हणून मी पोलिसांना कळवलं. नशीब मी बॉम्बची पिन ओढली नाही. पिन ओढली असती तर काय झालं असतं काय माहीत.
- संभाजी चव्हाण, साकुर्डी
फोटो : १७ केआरडी ०३
कॅप्शन : प्रतिकात्मक
फोटो : १७ केआरडी ०१
कॅप्शन : तांबवे येथे नदीत आढळलेले बॉम्ब.