आदर्की : फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात रब्बी हंगामातील सुगी अंतिम टप्प्यात आली असतानाच वादळी पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांची पिके वाचविण्यासाठी त्रेधातिरपीट उडाल्याचे चित्र होते.
फलटण पश्चिम भागातील आदर्की परिसरात ज्वारी काढणी, पेंढ्या बांधणे, ज्वारी मळणी, ज्वारी, गहू वाळवणे, गहू काढणे, हरभरा, करडी, काढणी, मळणी, कडबा टॅक्टर ट्रॉली, बैलगाडीद्वारे गोळा करणे, गंजी लावणे अशी रब्बी हंगामातील कामे अंतिम टप्प्यात असून, उरकत आली आहेत. त्यातच दिवसभर उन्हामुळे अंगातून घामाच्या धारा वाहात असताना दुपारी तीन-चारच्या सुमारास वादळी पावसाने सुरुवात केली. ज्वारी, गहू झाकणे, ज्वारीची कणसे, हरभरा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग उडाली होती.
आदर्की खुर्द, हिंगणगाव, सासवड, बिबी, घाडगेवाडी, आळजापूर, कापशी गावांमध्ये कमी-जास्त प्रमाणात पाऊस पडला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे.