नाष्ट्याला थांबले अन् वनविभागाच्या जाळ्यात अडकले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:44 IST2021-09-05T04:44:49+5:302021-09-05T04:44:49+5:30
सातारा : खंडाळा नियतक्षेत्रात पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नाष्टा करण्यासाठी थांबलेल्या एका वाहनाविषयी फिरत्या पथकाला शंका आली. चाैकशी केल्यानंतर या ...

नाष्ट्याला थांबले अन् वनविभागाच्या जाळ्यात अडकले!
सातारा : खंडाळा नियतक्षेत्रात पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नाष्टा करण्यासाठी थांबलेल्या एका वाहनाविषयी फिरत्या पथकाला शंका आली. चाैकशी केल्यानंतर या टेम्पोमधून विनापरवाना लाकडी कोळशाची वाहतूक सुरू असल्याचे आढळले. याचे कनेक्शन थेट पुण्यापर्यंत लागल्याने याप्रकरणी २ कंपनी आणि एका डेपोतून मुद्देमाल जप्त करून उर्वरित चाैकशीची नोटीस वनविभागाने काढली आहे. याप्रकरणी पुण्याचे परमेश्वर ज्ञानोबा साबळे यांच्यावर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, ‘शनिवार, दि. २८ ऑगस्ट रोजी पुणे- बंगळूर महामार्गावर टेम्पो क्रमांक (एमएच १२ एसएफ ७८५७) एका हाॅटेलच्या बाहेर उभा होता. वन विभागाच्या फिरत्या पथकाला या टेम्पोची शंका आल्याने त्यांनी तपासणी केली असता, त्यात कोळशाची पोती आढळून आली. लाकूड-कोळसा वाहतूक करण्याची कोणतीही परवानगी नसल्याचे आढळल्यानंतर मुद्देमालासह गाडी वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आली. वाहनचालकाकडे याबाबत अधिक चाैकशी केल्यानंतर त्याने हा कोळसा यश अथिर्ंग प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या कंपनीचा असून, तो एस. टी. स्टील, पुणे या कंपनीने पुरवला असल्याचे स्पष्ट केले. यात १२५ पोती कोळसा जप्त केला तसेच त्यांना कोळसा पुरविणाऱ्या न्यू कोमल चारकोल डेपो यांचाही १५ पोती लाकडी कोळसा चाैकशी करून सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत उपवनसंरक्षक महादेव मोहिते, रेश्मा व्होरकाटे, महेश झांजुणेर्, खंडाळा वनपरिक्षेत्राच्या वनक्षेत्रपाल प्रियांका पाटील-महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल आर. आर. जगताप, वनरक्षक मनीषा बांगर, वसंत गवारी, प्रकाश शिंदे, सुनील राऊत, विश्वास मिसाळ यांनी कारवाई केली.
कोट
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. यातील ज्या वाहनांची आम्हाला शंका येते, त्याची चाैकशी केली जाते. अनेकदा लाकूड-कोळसा वाहतूक करायला परवानगी लागते, हे आम्हाला ज्ञात नव्हते, अशी कारणं सांगितली जातात. कारवाई टाळण्याची ही एक सबब असते, त्यामुळे दोषींवर कायद्याचा बडगा उगारल्याशिवाय अशा प्रकारांवर आळा बसत नाही.
- प्रियांका पाटील-महांगडे, वनक्षेत्रपाल, खंडाळा