७२ तासांत उत्पादन थांबवा

By Admin | Updated: May 17, 2015 01:28 IST2015-05-17T01:28:17+5:302015-05-17T01:28:17+5:30

‘किसन वीर’, ‘कृष्णा’ला आदेश : कृष्णेचे पाणी दूषित केल्याप्रकरणी कारवाई

Stop production in 72 hours | ७२ तासांत उत्पादन थांबवा

७२ तासांत उत्पादन थांबवा

सातारा : कृष्णा नदीचे पाणी प्रदूषित केल्याचा ठपका ठेवत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या येथील उपप्रादेशिक कार्यालयाने वाई तालुक्यातील ‘किसन वीर’ व कऱ्हाड तालुक्यातील ‘कृष्णा’ या दोन्ही सहकारी साखर कारखान्यांना ७२ तासांच्या आत उत्पादन प्रक्रिया थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. दि. १४ मे रोजी ही नोटीस धाडण्यात आली आहे.
किसन वीर सहकारी साखर कारखान्याचा चिंधवली नाल्याजवळ कंपोष्ट खत प्रकल्प आहे. लिंब (ता. सातारा) येथील लोकांच्या तक्रारींवरून उपप्रादेशिक प्रदूषण मंडळाने प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली होती. या प्रकल्पाचे दूषित पाणी चिंधवली नाल्यातून कृष्णा नदीत मिसळत असल्याचे उपप्रादेशिक प्रदूषण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. याबाबत किसन वीर कारखान्याला नोटीसही देण्यात आली होती; परंतु तिचे उत्तर न आल्याने उत्पादन प्रक्रिया थांबविण्याचे निर्देश देण्यात आल्याचे कारखान्याला पाठविलेल्या नोटिसीत म्हटले आहे.
तसेच कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे प्रदूषित पाणीही कृष्णा नदीत मिसळत आहे. याठिकाणीही उपप्रादेशिक प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. या कारखान्याला प्रदूषण मंडळातर्फे कारणे दाखवा नोटीस धाडण्यात आली होती. आॅक्टोबर २०१४ व मार्च २०१५ अशा दोन नोटिसा पाठवूनही त्याबाबत समाधानकारक उत्तर आले नाही. कृष्णा नदीचे पाणी प्रदूषित करण्याचा ठपका या दोन कारखान्यांवर ठेवला आहे. हे दोन्ही कारखाने ‘नो पोल्युशन’ झोनमध्ये येतात. त्यामुळे या कारखान्यांनी हवा व पाणी यांचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.कारखान्यांनापरवाना देताना पाणी, हवा यांचे प्रदूषण होणार नाही, याबाबत काळजी घेणे हे कायद्याने बंधनकारक असल्याचे या नोटिसीत म्हटले आहे. प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी ए. एफ. देशमाने यांनी ही नोटीस बजावली आहे. (प्रतिनिधी)
 

Web Title: Stop production in 72 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.