‘राष्ट्रवादी युवक’चा महामार्गावर रास्ता रोको

By Admin | Updated: October 8, 2015 00:58 IST2015-10-07T22:02:38+5:302015-10-08T00:58:35+5:30

चिन्मय कुलकर्णी यांच्या आंदोलनास समर्थन : आंदोलकांवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई

Stop the path of 'Nationalist Youth' on the highway | ‘राष्ट्रवादी युवक’चा महामार्गावर रास्ता रोको

‘राष्ट्रवादी युवक’चा महामार्गावर रास्ता रोको

शिरवळ : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे काम घेतलेल्या रिलायन्स इन्फ्राला ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या चिन्मय कुलकर्णी यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी (दि. ७) पुणे-सातारा हद्दीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शिरवळ पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले. दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या या आंदोलनाचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले. आंदोलनाच्या ठिकाणी आंदोलक कमी व पोलीस जास्त, अशी स्थिती दिसून आली. पोलिसांनी आंदोलकांना महामार्गावरून अवघ्या पाच मिनिटांत उचलल्याने आंदोलन हे फक्त रास्ता रोकोचा प्रीमिअर शो ठरला असल्याची चर्चा आंदोलनस्थळी सुरू होती.राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामाबाबत व अपघाताची वाढती संख्या लक्षात घेऊन चिन्मय कुलकर्णी शिंदेवाडी येथे उपोषणाला बसले आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नितीन भोसले, खंडाळा तालुकाध्यक्ष मनोज पवार, शिरवळ शहराध्यक्ष विशाल परखंदे यांच्या नेतृत्वाखाली शिदेंवाडी याठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जवळेचे सरपंच अजय भोसले, राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष चंद्र्रकांत पाचे, रविराज दुधगावकर, हिम्मत सोनावणे, अय्याज पठाण, बाळासाहेब पानसरे, महेश चव्हाण, विजय सोनावणे, सागर जाधव, संकेत महांगरे, वैभव सोनावणे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दरम्यान, रास्ता रोको आंदोलनात आंदोलक कमी पोलीस जास्त, अशी स्थिती दिसल्याने फज्जा उडाला.
आंदोलनस्थळी फलटणचे पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश चोपडे, वाईचे पोलीस उपविभागीय अधिकारी दीपक हुंबरे, शिरवळ पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली सातारा येथील दंगा नियंत्रक पथक, वाहतूक नियंत्रक पथक, लोणंद, शिरवळ, खंडाळा, सातारा, वाई येथील फौजफाटा तैनात केला होता. (प्रतिनिधी)

शिंदेवाडी, ता. खंडाळा येथे राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामाबाबत आमरण उपोषणासाठी बसलेल्या संकल्प इंजिनिअरिंग सांस्कृतिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष चिन्मय खंडोजी कुलकर्णी यांनी बुधवारी (दि. ७) सातव्या दिवशी आंदोलन स्थगित केले. रिलायन्स इन्फ्रा व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांना मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्याने बुधवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास प्रोजक्ट डायरेक्टर मदन दिवाण यांच्या हस्ते कुलकर्णी यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडले.
राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामाबाबत चिन्मय कुलकर्णी व रिलायन्स इन्फ्रा व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांची सुमारे एक तास चर्चा झाली. या चर्चेत कुलकर्णी यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. अधिकाऱ्यांनी मागण्यांबाबत उपाययोजना करण्याबात लेखी आश्वासन कुलकर्णी यांना दिले.
यावेळी रिलायन्स इन्फ्राचे प्रोजेक्टर डायरेक्टर रतनप्रकाश, प्रोजक्ट टेक्निकल श्रीकांत पोतदार, रिलायन्सचे प्रोजेक्ट मॅनेजर ब्रिजेंद्र किशोर सिंग, अनुपम खेर, पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे, संकल्पचे कार्यकर्ते राघवेंद्र मिश्रा आदी उपस्थित होते.


आंदोलक, पोलिसांत शब्दिक चकमक
शिदेंवाडी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता गृहित धरून आंदोलनस्थळी कडेकोट पोेलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, कार्यकर्ते कमी व पोलीस जास्त ही स्थिती दिसल्याने पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला. यावेळी आंदोलन सुरू झाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांतच पोलिसांनी आंदोलकाना महामार्गावरून बाजूला घेत ताब्यात घेतले. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नितीन भोसले यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत शाब्दिक चकमक उडाली.


पोलीस फौजफाटा
आंदोलनस्थळी दंगा नियंत्रक पथक, वाहतूक नियंत्रक पथक, लोणंद, शिरवळ, खंडाळा, सातारा, वाई येथील पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

Web Title: Stop the path of 'Nationalist Youth' on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.