ललगुण परिसरातील अवैध धंदे बंद करा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:12 IST2021-02-06T05:12:23+5:302021-02-06T05:12:23+5:30
पुसेगाव : खटाव तालुक्याच्या उत्तर भागात बरेच दिवस बंद केलेले अवैध व्यवसाय पुन्हा डोके वर काढू लागले आहेत. बेकायदा ...

ललगुण परिसरातील अवैध धंदे बंद करा...
पुसेगाव : खटाव तालुक्याच्या उत्तर भागात बरेच दिवस बंद केलेले अवैध व्यवसाय पुन्हा डोके वर काढू लागले आहेत. बेकायदा दारूविक्री, मटका, वाळू उपसा करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. ललगुण (ता. खटाव) येथील अवैध धंदे बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या तालुका कार्याध्यक्षा मुमताज मुलाणी यांनी केली आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठांना लेखी निवेदन दिले आहे, तर संबंधितांवर गुन्हा दाखल करूनही अद्याप त्यांचे हे अवैध व्यवसाय सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुसेगाव-फलटण रस्त्यावरील केदार मंगल कार्यालय व लॉजच्या परिसरात गुरूकृपा हॉटेल आहे.
या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ बनवत नसून हॉटेलच्या परवान्यावर फक्त दारूविक्री केली जात आहे. त्यामुळे मोकळ्या झालेल्या प्लास्टिक बाटल्या, ग्लास रात्री-अपरात्री जाळण्यात येतात. प्लास्टिकच्या वासाने या परिसरात राहणाऱ्या लोकांना उग्र वासाने श्वसनाचे विकार होऊ शकतात. हॉटेलमधून दारू पिऊन बाहेर पडणारे मद्यपी हावभाव करत असतात.
लॉकडाऊन काळात या ठिकाणी एकही दिवशी दारूचा व्यवसाय बंद नव्हता. तसेच २६ जानेवारी व १५ ऑगस्ट या ‘ड्राय डे’लाही इथे दारूविक्री होत असते. या पंचक्रोशीतील तरुण-तरुणी वाममार्गाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरात मद्यपींची वर्दळ असल्याने शिवीगाळ, भांडणेही सुरू असतात. तरी परिसरातील लोकांना याचा सामना करावा लागत आहे. तरी या ठिकाणचे सर्व अवैध व्यवसाय व गैरप्रकार कायमस्वरूपी बंद करावेत; अन्यथा आंदोलन, धरणे उपोषण या मार्गाचा अवलंब करावा लागेल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. हे निवेदन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष, उपमुख्यमंत्री, पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सातारा यांना दिले आहेत.