महामार्गावरच थांबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:39 IST2021-03-20T04:39:31+5:302021-03-20T04:39:31+5:30
शिरवळ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरच अनेक गाड्या प्रवाशांना घेण्यासाठी किंवा उतरविण्यासाठी थांबत असतात. वास्तविक पाहता महामार्गावर कोणत्याही प्रकारची वाहने ...

महामार्गावरच थांबा
शिरवळ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरच अनेक गाड्या प्रवाशांना घेण्यासाठी किंवा उतरविण्यासाठी थांबत असतात. वास्तविक पाहता महामार्गावर कोणत्याही प्रकारची वाहने उभी करू नये, असे संकेत आहेत. तरीही खासगी वाहने उभी केली जातात. त्यामुळे महामार्गावर अपघातांना निमंत्रण मिळत आहे. हे कोठेतरी थांबविण्याची गरज आहे.
००००००
पाणपोईची गरज
सातारा : साताऱ्यातील अनेक भागांत सूर्यनारायण आग ओक आहे. त्यामुळे वातावरणात उकाडा जाणवत आहे. अंगातून घामाच्या धारा लागत असल्याने नागरिकांना सतत तहान लागत आहे. विविध शासकीय कामांनिमित्ताने ग्रामस्थ ग्रामीण भागातून येत असतात. पाण्याअभावी त्यांचे हाल होते. त्यामुळे सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन सातारा शहरात पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोई सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.
००००००
सतीश गंगावणे यांचा पुरस्काराने गौरव
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील बावडा येथील आदर्श शिक्षण संस्था संचलित ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूलचे संचालक प्रा. डाॅ. सतीश गंगावणे यांचा दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट शास्त्रज्ञ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्काराबद्दल त्यांचा शाळेच्या वतीनेही गौरव करण्यात आला.
०००००
व्यवसायकर भरा
सातारा : नोंदणीकृत व्यक्ती, मालकांनी व्यवसायकर ३१ मार्चपूर्वी भरणे आवश्यक आहे. त्यामुळे नोंदणीकृत तसेच नावनोंदित व्यक्ती, मालकांनी करभरणा विहित मुदतीत करून शासनाच्या महसूल वाढीस सहकार्य करावे, असे आवाहन व्यवसायकर अधिकारी व्ही. व्ही. घोलप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
००००००
झाडे लागली कोमेजू
सातारा : जिल्ह्यातील बहुतांश जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळांसमोर असलेल्या मैदानांत कोरोनापूर्वी शोभेची झाडे, फुलझाडे लावली होती. त्यांची सेवकाकडून निगा राखली जात होती. मुले, शिक्षक त्यांना पाणी घालत असत. मात्र कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर ते बंद आहे. त्यामुळे झाडेही कोमेजू लागली आहेत.
००००००
सलग सुट्यांमुळे अडचणींमध्ये वाढ
सातारा : गेल्या आठवड्यात बॅँकांना सलग सुट्या आल्या होत्या. त्यामुळे साताऱ्यातील बहुतांश एटीएम केंद्रांमध्ये खडखडाट जाणवत होता. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला होता. पैसेच मिळत नसल्याने सातारकर एका केंद्रातून दुसऱ्या केंद्रात फेरफटका मारत होते.
०००००
टपालपेट्यांची गरज
सातारा : साताऱ्यासह कऱ्हाड, शिरवळ, आदी मोठ्या शहरांमध्ये बहुमजली इमारती असतात. त्यामुळे त्या ठिकाणी टपालपेट्यांची नितांत गरज असते. पोस्टमनला प्रत्येक पत्रासाठी चौथ्या मजल्यावर जावे लागते. ही बाब अवघड जात असल्याने पार्किंगमध्ये टपालपेट्या बसवाव्यात, अशी मागणी पोस्टमनकडून केली जाते.
०००००००
पाण्याच्या टाक्यांची दुरुस्ती
सातारा : ग्रामीण भागातील अनेक टाक्यांची दुरवस्था झालेली आहे. टाकीला गळती लागून पाणी वाया जात आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाळ्यात आणखी अडचणींचा सामना करावा लागत आहे. म्हणून संबंधित ग्रामपंचायतींनी पाण्याच्या टाक्यांची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
००००००
मोळेश्वरमध्ये शेतकरी प्रशिक्षण उत्साहात
पेट्री : तीर्थक्षेत्र मोळेश्वर येथे ऊर्जा फाऊंडेशनच्या वतीने शेतकरी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. यावेळी ऊर्जा फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विजय जंगम, तहसीलदार राजेंद्र पोळ, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, आदी उपस्थित होते. कोरोनाकाळात विशेष कामगिरी केलेल्या सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर यांचा सन्मान करण्यात आला.
००००००००
चौकात रात्रीही गर्दी
सातारा : जिल्ह्यात काही महिन्यांनंतर पुन्हा काेरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे रात्री अकरानंतर संचारबंदी लागू केली आहे. तरीही राजवाडा, मोती चौकात रात्री अकरा वाजताही असंख्य सातारकर आइस्क्रीम, दूध पिण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे कारवाईची गरज आहे.
००००
नियमांचे उल्लंघन
सातारा : सातारा शहरातील बहुतांश वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे इतर दुचाकीस्वारांची फसगत होत असते. अनेकजण राजपथावर लेन तोडत असतात. अचानक वाहन आल्याने इतर वाहनांना जागाच मिळत नाही. त्यामुळे अपघातांचा धोका वाढत आहे.