पुरंदरेंचा पुरस्कार थांबवा
By Admin | Updated: August 18, 2015 00:52 IST2015-08-18T00:52:31+5:302015-08-18T00:52:31+5:30
उदयनराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र : आक्षेपांचा सोक्षमोक्ष लावा

पुरंदरेंचा पुरस्कार थांबवा
सातारा : बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारावरून उठलेल्या वादात आता शिवरायांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनीही उडी घेतली आहे. पुरंदरेंच्या लेखनाबाबत घेतलेल्या आक्षेपांचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत पुरस्कार स्थगित ठेवावा, असे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.
‘महाराष्ट्र शासनाने ब. मो. ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर केला आणि तो प्रदान करण्याची तयारी केली आहे. तथापि, पुरंदरे यांनी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या काही लेखनासंबंधात पुरस्कार जाहीर होण्यापूर्वी आणि त्यानंतर फार मोठ्या प्रमाणात आक्षेप जाहीरपणे घेतले जात आहेत. जरूर त्या अभ्यासाअंती, या आक्षेपात तथ्य असल्याचे आमचेही मत आहे आणि त्यामुळे ही बाब आम्हाला अत्यंत वेदनादायी झाली आहे. सबब या संपूर्ण आक्षेपांची तपासणी करून, जोपर्यंत सोक्षमोक्ष लागत नाही, तोपर्यंत पुरंदरे यांना जाहीर झालेला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार स्थगित ठेवावा,’ असे परखड मत खासदार उदयनराजे यांनी व्यक्त केले आहे.
‘छत्रपती शिवरायांमुळे भारत देश झाला. महाराष्ट्राला प्रतिष्ठा मिळाली. जगातील प्रगत देशांत शिवरायांविषयी संशोधन व अभ्यास केला जातो. किंबहुना राज्यकर्ता कसा असावा, तर रयतप्रेमी शिवरायांसारखा, असे दाखले जागतिक स्तरावरून केल्या जाणाऱ्या अभ्यासात नमूद केले जातात. जिजाऊ आईसाहेब तर राष्ट्रमाता आहेत.
शासनाने अरबी समुद्रामध्ये १०८ फूट उंचीचे शिवस्मारक उभे करण्याचे जाहीर केले आहे. शिवराय व जिजाऊ आईसाहेब यांच्याविषयी शासनाच्या कृतिशील भावनेचे विकृतीकरण होऊ नये म्हणून तज्ज्ञांकडून लेखनाची तपासणी करून आक्षेपांचे निरसन होईपर्यंत हा पुरस्कार वितरणाचा निर्णय स्थगित करावा,’ असेही खासदार उदयनराजे यांनी नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
आक्षेपार्ह लेखन अधिकृत केल्याचा समज
‘बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेल्या असंविधानिक लेखनामुळे सामान्य जनतेमध्ये पुरंदरे यांना जाहीर झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’बाबत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. शासनाने पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार घोषित करून त्यांचे आक्षेपार्ह लेखन अधिकृत केल्याचा समज मोठ्या प्रमाणावर समाजात पसरत आहे,’ असे खासदार उदयनराजे यांनी नमूद केले आहे.