फलटण : फलटण शहरात गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीमध्ये जिंती नाका मलटण या ठिकाणी दोन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक झाली. पोलिसांनी पूर्वसूचना देऊनही दगडफेक केल्याप्रकरणी दोन्ही मंडळांच्या १५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये १३ जणांना अटक केली असून एकजण अल्पवयीन आहे. तर एकजण पळून गेला आहे.विशाल पांडुरंग माळी (वय ३०), देवीदास बापू माळी (२५), संपत भरत माळी (२४), अजय पांडुरंग माळी (२९), रंगराव भरत माळी (२७), अमर राजू माळी (३०), नेताजी प्रकाश माळी (२८), प्रकाश काळुराम माळी (५०), अमोल आकाराम मोरे (२२), रमेश संजय माळी (२५), अजय रघुनाथ माळी (३२), सुशांत सुनील जुवेकर (१८), शंकर रामराव जुवेकर (३०), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यांच्यासह एकजण अल्पवयीन आहे. अजय संजय जाधव (२५) हा आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.याबाबत माहिती अशी की, फलटण शहरातील दोन मंडळांच्या कार्यकर्त्यांत वादावादी सुरू असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. त्यासोबतच ‘भांडणे करू नका,’ अशी समज दिली होती. त्यानंतरही पोलिसांचे काही न ऐकता पोलिसांसमोरच तेथील दगड उचलून एकमेकांना मारण्यास सुरुवात केली.
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी शिवशक्ती गणेशोत्सव मंडळ आणि जय भवानी तरुण गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये १३ आरोपींना अटक केली असून, एक आरोपी फरार आहे.