अन्न सुरक्षा योजनेतील धान्यात दगड अन् माती
By Admin | Updated: October 16, 2014 22:48 IST2014-10-16T22:00:21+5:302014-10-16T22:48:58+5:30
गरिबांची लावलीय चेष्ठा : निकृष्ट दर्जेच्या धान्यामुळे योजना बासनात

अन्न सुरक्षा योजनेतील धान्यात दगड अन् माती
पिंपोडे बुद्रूक : सार्वजनिक वितरण व्यवस्थेकडून अन्न सुरक्षा योजनेंतर्गत पुरविण्यात येत असलेल्या धान्यात दगड अन् माती मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. धान्याच्या एकुण वजनाच्या पंचवीस टक्के हे प्रमाण असल्याने एकप्रकारे गरिबांची चेष्ठाच लावली आहे. कमी दरात ते मिळत असल्याने ग्राहकही निमुटपणे खरेदी करत आहेत.
याबाबत माहिती अशी की, जनतेला वेगवेगळ्या योजनांमधून स्वस्त धान्य दुाकानातून अन्न धान्य वितरित केले जाते. त्यामुळे प्रामुख्याने तांदूळ आणि गव्हाचा समावेश असतो. गेल्या सहा महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने अन्न सुरक्षा योजना राबविण्याचे धोरण अवलंबिले.
त्यामध्ये किमान उत्पन्न गट निश्चित करुन त्या कुटुंबांना प्राधान्यांने प्रतीमानसी पाच किलो धान्य दरमहा देण्याचे ठरले आहे. त्यात प्रामुख्याने गहू आणि तांदळाचे वाटप केले जाते. ते प्रमाण प्रतीव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदळू असे असून त्याचा दर अनुक्रमे दोन व तीन रूपये प्रतिकिलो आहे.पिंपोडेबुद्रूक परिसरातील सर्वच रेशन दुकानांतून या धान्यांचे वितरण केले जाते. मात्र, ऐन दसरा-दिवाळीच्या तोंडावर आलेले धान्य खराब आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर दगड व मातीचे प्रमाण आहे. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजी आहे. धान्य खराब असल्यामुळे अनेक लाभांर्थ्यांकडून ते घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी अनेक रेशनदुकान चालकांना काळाबाजार करण्याची आयती संधी मिळत आहे. मात्र, याकडे प्रशासन गांभिर्याने पाहत नाही. सामान्यांना मिळत असलेल्या धान्यात माती कालवणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी योजनेच्या लाभार्थ्यांमधून होत
आहे. (वार्ताहर)
दिवाळीला तरी चांगल्या धान्य हवे
विधानसभा निवडणुकीची धामधूम जिल्ह्यात सुरु होती. सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात बुधवारी मतदान झाले. या निवडणुकीत आपल्या राजकीय नेत्यांचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले होते. त्यातच पिंपोडे बुद्रूक परिसरातील काही स्वस्त धान्य दुकानदारही होते. जाईल तेव्हा दुकान बंद अवस्थेत पाहण्यास मिळत होते. त्यामुळे ग्राहकांतून संताप व्यक्त होता. त्यातून मिळालेच तर निकृष्ट धान्य मिळत होते. दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आता तरी गरिबांची दिवाळी चांगली जाण्यासाठी चांगल्या प्रतीचे धान्य उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी या योजतेतील लाभार्थ्यांतून होत आहे.
शासनाच्या पुरवठा विभागाकडून पुरविले जाणाऱ्या धान्याचे नियमित वितरण केले जाते. त्यामध्ये किड असल्यास धान्य बदलून दिले जाते. त्याजे जे धान्य येईल ते ग्राहकांना देण्याशिवाय आमच्या हाती दुसरा पर्यायच नाही.
- रेवनसिद्ध महाजन
स्वस्त धान्य दुकानदार, पिंपोडे बुद्रूक