निवडीसाठी नेत्यांना साकडे
By Admin | Updated: September 18, 2014 23:24 IST2014-09-18T22:45:13+5:302014-09-18T23:24:03+5:30
जिल्हा परिषद निवड : नेत्यांकडून ‘वेट अॅण्ड वॉच’चे धोरण

निवडीसाठी नेत्यांना साकडे
सांगली : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेतील अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडी दोन दिवसांवर येऊन ठेपल्या असल्या तरी, अद्याप सत्ताधारी राष्ट्रवादीकडून अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचे नाव निश्चित केले गेलेले नाही़ इच्छुकांनी नेत्यांना प्रत्यक्ष भेटून साकडे घातले आहे. नेत्यांनी मात्र ‘वेट अॅण्ड वॉच’ अशी भूमिका घेतली आहे. अध्यक्षपद गृहमंत्री आर. आर. पाटील गटास, तर उपाध्यक्षपद ग्रामविकासमंत्री जयंत पाटील गटाला मिळण्याची शक्यता आहे़
आटपाडी तालुक्यातील दिघंचीच्या मनीषा पाटील आणि शिराळा गटातील सदस्या व विद्यमान महिला, बालकल्याण समिती सभापती वैशाली नाईक यांनीही अध्यक्षपदावर दावा सांगितला आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची सर्वांना उत्सुकता आहे. सध्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे बहुमत असून त्यांच्याकडे ३६ सदस्य आहेत, तर काँग्रेसकडे २३ सदस्य आहेत. त्यामुळे काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्याकडे कोणतेच पद येणार नसल्याचे स्पष्ट आहे.
पुढील महिन्यात विधानसभेचा धुरळा उडणार आहे. साहजिकच अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीवरदेखील त्याचा प्रभाव पडणार आहे. लोकसभा निवडणुकीत तासगाव तालुक्यातून भाजपला मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे विधानसभेत राष्ट्रवादीला मताधिक्य मिळवून देण्यासाठी तासगावकडे अध्यक्षपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उपाध्यक्ष पदासाठीही चुरस असून यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद लिंबाजी पाटील प्रमुख दावेदार आहेत. जत तालुक्यातील बनाळी येथील संजीवकुमार सावंत, मिरज तालुक्यातील आप्पासाहेब हुळ्ळे, राजेंद्र माळी यांचीही नावे चर्चेत आहेत. त्यामुळे संधी कोणाला मिळणार, याची चर्चा सध्या सुरू आहे.
राष्ट्रवादीने जि. प. सदस्यांना व्हीप जारी केला आहे. दि. २० रोजी काँग्रेसच्या सदस्यांची, तर दि. २१ रोजी राष्ट्रवादीच्या सदस्यांची सांगलीतील पक्षाच्या कार्यालयात बैठक होणार आहे. त्यामध्ये कोणता निर्णय घेतला जातो आणि कोणाची नावे अधिकृतरित्या जाहीर होतात, याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)
काँग्रेसचे जिल्हा परिषदेमध्ये संख्याबळ अपुरे आहे. आम्ही सध्या कोणतीही रणनीती ठरविली नसून, शनिवारी होणाऱ्या सदस्यांच्या बैठकीतच निर्णय जाहीर करण्यात येईल.
- मोहनराव कदम, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी अद्याप कोणाचीही नावे अंतिम झालेली नाहीत. रविवारी पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्यांची बैठक होणार आहे. त्यामध्ये दोन्ही नावे जाहीर करण्यात येतील.
- विलासराव शिंदे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी