महाबळेश्वरच्या विकासासाठी प्रशासनाने उचलली पावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:19 IST2021-02-05T09:19:27+5:302021-02-05T09:19:27+5:30
महाबळेश्वर : नियोजित बाजारपेठ विकास व सुशोभीकरणाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बुधवारी वेण्णालेक परिसर, पेटिट रस्ता, पेटिट लायब्ररी, ...

महाबळेश्वरच्या विकासासाठी प्रशासनाने उचलली पावले
महाबळेश्वर : नियोजित बाजारपेठ विकास व सुशोभीकरणाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बुधवारी वेण्णालेक परिसर, पेटिट रस्ता, पेटिट लायब्ररी, मुख्य सुभाष चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पाहणी केली, तसेच अधिकाऱ्यांकडून माहितीही घेतली.
मागील वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाबळेश्वरला भेट देऊन प्रलंबित प्रश्नांची माहिती घेतली होती. त्यानंतर राज्य अर्थसंकल्पात शहर विकासासाठी १०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. कोरोनामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला. मात्र, मागील आठवड्यातच मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली खास करून महाबळेश्वरच्या विकासासाठी मुंबई येथे बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाबळेश्वरचा पर्यटन विकास पर्यावरणपूरक करावा यावर भर देण्यात यावा, असे सांगितले. तसेच वन, पर्यावरण व पर्यटन विभागाने समन्वय साधून ही कामे करावीत, असेही सांगितले होते.
यासोबतच मुख्यमंत्र्यांनी वेण्णा तलावाचा विकास, मुख्य बाजारपेठेचे सुशोभीकरण आदी कामे ही पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात यावीत, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार स्थानिक पालिका प्रशासनासह जिल्हा प्रशासनही कामाला लागले आहे. बाजारपेठ व वेण्णालेक येथील सुशोभीकरणाचा आराखडा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
यावेळी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी, तसेच पालिका अधिकारी उपस्थित होते.
चौकट :
विकासकामांचा भाग...
विकासकामांचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी वेण्णालेक परिसर, पेटिट रस्ता येथील पालिका वाहनतळ, लायब्ररी या हेरिटेज वास्तूस भेट देत पाहणी केली, तसेच मुख्य बाजारपेठेचीही पाहणी केली.
फोटो दि.२७ महाबळेश्वर कलेक्टर फोटो...
फोटो ओळ : महाबळेश्वर येथील बाजारपेठेची पाहणी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केली. (छाया : अजित जाधव)