श्रमिक मुक्ती दलाचे आजपासून राज्यव्यापी आंदोलन
By Admin | Updated: April 22, 2015 00:27 IST2015-04-21T22:53:23+5:302015-04-22T00:27:47+5:30
भारत पाटणकर : धरणातील पाणी अडवणार

श्रमिक मुक्ती दलाचे आजपासून राज्यव्यापी आंदोलन
सातारा : आजपर्यंत शासनाने केवळ आश्वासने दिली. विविध प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत सरकार उदासीन असल्याचे दिसत आहे. राज्यात तीन लाख कुटुंब विविध प्रकल्पग्रस्त आहेत. त्यांच्यासाठी नवीन मागण्या नाही तर मंजूर केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी राज्यातील ११ जिल्ह्यांत ६ एप्रिलपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु आहे. तरीही सरकाराने दखल घेतली नाही. त्यामुळे बुधवार दि. २२ पासून राज्यात विविध ठिकाणच्या धरणातील पाणी अडविण्यात येणार आहे. असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
डॉ. पाटणकर म्हणाले, ६ एप्रिल पासून राज्यातील ११ जिल्ह्यांत्र बेमुद ठिय्या आंदोलन सुरू आहे. पालकमंत्री विजय शिवतारे यांनी तुमची बैठक लावतो. तुम्ही आंदोलन स्थगित करा. असे सांगितले होते. परंतु त्यावेळेस आम्ही ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन स्थगित करणार नाही, असे सांगितले होते. आजअखेर मुख्यमंत्र्यांनी बैठकीला बोलावले नाही किंवा चर्चाही केली नाही . यावरुन आमचा निर्णय योग्य होता, हे आता स्पष्ट झाल आहे.
या प्रकारामुळेच आमचा शासनावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे आता आंदोलन तीव्र करणे अपरिहार्य झाले आहे. मुख्यमंत्री विदेश दौऱ्यावरुन येऊन बरेच दिवस झाले. या काळात ते राज्याच्या विविध भागात गेले, कार्यक्रमांना हजेरी लावली परंतु ज्यांनी राज्याच्या विकासासाठी त्याग केला त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. राज्यात जवळपास ३ लाख कुटुंबे म्हणजे १५ लाखाहून अधिक माणसे विविध प्रकल्पग्रस्त आहेत. एवढया मोठया लोकसंख्येचे प्रश्न सोडवण्याची इच्छाशक्ती राज्यकर्त्यांमध्ये नाही. कोणत्या नवीन मागण्यांसाठी आंदोलन नाही तर निघालेल्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. ती व्हावी ही आचमी प्रमुख मागणी आहे.
या मागणीकडेही सरकार गांभीर्याने बघत नाही. कोयना धरण होऊन इतके वर्ष झाले परंतु त्यांचेही अजून पूर्ण पुनर्वसन झाले नाही. या अंमलबजावणीसाठी एवढा उशीर लागण्याचे कारणच काय त्यामुळे आता बुधवारपासून राज्यात विविध ठिकाणी धरणातील पाणी अडवले जाणार आहे. (प्रतिनिधी)
अभयारण्यातील पर्यटकांनाही अडविणार
सातारा जिल्हयातील तारळी, उरमोडी, कोयना धरणातील पाणी अडवण्यात येणार आहे. तसेच सांगली आणि कोल्हापूरमधील वारणा धरण तसेच चांदोली अभयारण्याच्या गेटवर पर्यटकांना अडविण्यात येईल. कोल्हापूरच्या पश्चिम भागातील आजरा, चंदगड येथे सुरू असलेल्या धरणाचे काम बंद पाडण्यात येणार आहे. सोलापूरमधील उजनी धरणातून तसेच मराठवाडयातील जायकवडी धरणातून पाणी सोडून देण्यात येणार नाही. सध्याच्या अर्थसंकल्पात उरमोडी, तारळी, वांगसाठी कोणताही निधी देण्यात आलेला नाही.