शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:14 IST2021-02-06T05:14:56+5:302021-02-06T05:14:56+5:30
वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शिक्षक संघाने पुढाकार घेऊन शिक्षकांच्या सर्व समस्या सोडविण्याची आग्रही मागणी ...

शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शिक्षक संघाने पुढाकार घेऊन शिक्षकांच्या सर्व समस्या सोडविण्याची आग्रही मागणी संघटनेने माण तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सोनाली विभुते यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांना निवेदन देण्यात आले.
दहिवडी येथील माण पंचायत समितीच्या सभागृहात प्राथमिक शिक्षक बँकेचे उपाध्यक्ष व प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष महेंद्र अवघडे यांनी शिक्षकांचे प्रश्न मांडले. वरिष्ठ वेतनतश्रेणी व वैद्यकीय बिले मंजूर असून, ती संबंधित शिक्षकास तत्काळ मिळावीत, वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यासाठी असणारी प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्राची अट रद्द करावी, हिंदी भाषा सूट व स्थायित्व प्रमाणपत्राचे राहिलेल्या शिक्षकांचे प्रस्ताव मागवून ते मंजूर करावेत, गोपनीय अहवालाची झेरॉक्स प्रत संबंधित शिक्षकास मिळावी, कोरोना प्रतिबंधक लस शिक्षकांना लवकर उपलब्ध करावी, नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेस मार्गदर्शन केलेल्या यशस्वी शिक्षकांचा सन्मान करावा, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ज्या शिक्षकांनी काम केले त्यांना निवडणूक भत्ता मिळण्यासाठी पाठपुरावा करावा, गटविमा व निवृत्त शिक्षकांचे सुधारित पेन्शन प्रस्तावातील त्रुटी दूर कराव्यात, अशा अनेक प्रश्नांबाबत महेंद्र अवघडे यांनी यावेळी आवाज उठवला.
गटशिक्षणाधिकारी विभुते म्हणाल्या, ‘माण तालुका शिक्षक संघाने ज्या समस्या मांडल्या आहेत, त्या सर्व समस्या सोडविण्याची कार्यवाही तातडीने केली जाईल.’ यावेळी विभागीय कार्याध्यक्ष मोहनराव जाधव, सरचिटणीस सूरज तुपे, कार्याध्यक्ष महेश माने,वर्षा देवकर, पुंडलिक खराडे, अंजली कट्टे, बळीराम वीरकर, नथुराम जाधव, शिवाजीराव शिंगाडे, दत्तात्रय वाघमारे, दत्ता खाडे, विश्वास अर्जुन, महेश कुचेकर, दत्तात्रय कोळी, गणेश खंदारे, शशिकांत खाडे, महेश कुचेकर, राजाराम साठे, अजित गलांडे, दत्तात्रय कोळी, सचिन वीरकर, शहाजी जाधव, दत्तकुमार खाडे, नागनाथ कदम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रामभाऊ खाडे यांनी प्रास्ताविक केले. महेश माने यांनी आभार मानले.