मतपत्रिकेद्वारे मतदानाचा राज्याने विधानमंडळात कायदा करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:13 IST2021-02-06T05:13:54+5:302021-02-06T05:13:54+5:30
महाबळेश्वर : ‘मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याचा पर्याय जनतेसाठी उपलब्ध करून देण्यासाठी राज्याने विधान मंडळात कायदा करावा, अशा सूचना आपण राज्य ...

मतपत्रिकेद्वारे मतदानाचा राज्याने विधानमंडळात कायदा करावा
महाबळेश्वर : ‘मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याचा पर्याय जनतेसाठी उपलब्ध करून देण्यासाठी राज्याने विधान मंडळात कायदा करावा, अशा सूचना आपण राज्य सरकारला दिल्या आहेत,’ अशी माहिती विधानसभा अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी दिली.
महाबळेश्वर येथे खासगी दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पटोले म्हणाले, ‘आपल्या राज्यातील जनतेच्या मूलभूत अधिकारांची जोपासना करण्याचे काम राज्य सरकारचे आहे. मतदान हे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करायचे का मतपत्रिकेद्वारे हे ठरविण्याचा अधिकार जनतेचा आहे आणि त्यांना तो घटनेने दिला आहे. हा न्यायिक अधिकार जनतेला बहाल करण्यासाठी कलम ३२८ नुसार विधानमंडळात कायदा केला पाहिजे व तो राज्यपाल व राष्ट्रपतींना सादर केला पाहिजे म्हणून आपण तशा पद्धतीचा कायदा करण्याचे आदेशच राज्य सरकारला दिले आहेत.’
नागपूर येथील एका व्यक्तीने विधानसभा अध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्याकडे याचिका सादर करून मतदान मतपत्रिकेद्वारे करण्याचा अधिकार मिळावा, अशी मागणी केली. या याचिकेवर विचार करून निर्णय घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईतील विधान भवनात बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी, विधानमंडळ सचिवालयाचे सचिव राजेंद्र भागवत, राज्य मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग व राज्याचे विधी व न्याय विभागाचे सचिव भुपेंद्र गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
चौकट..
.. पर्याय निवडण्याचा मार्ग राज्यांना खुला होणार
गेली अनेक वर्षांपासून देशात सर्वच निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मशीनचा वापर केला जात आहे. अशा मतदान प्रक्रियेबाबत विश्वार्हता राहिली नसल्याने या पद्धतीला मोठा विरोध होत आहे. परंतु राज्य सरकाने कलम ३२८ चा वापर करून केंद्र सरकारला एकप्रकारे आव्हान दिले आहे. असे झाले तर भविष्यात अनेक राज्ये अशाप्रकारे कायदा करून राज्यातील निवडणुकांसाठी मतपत्रिकेचा पर्याय निवडण्याचा मार्ग राज्यांना खुला होणार आहे. त्यामुळे राज्याने तसा कायदा करून तो राज्यपाल व राष्ट्रपतींकडे पाठविल्यावर तो कायदा तेथेच लालफितीत अडकण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
फोटो..
०४महाबळेश्वर
विधानसभा अध्यक्ष नानासाहेब पटोले महाबळेश्वर येथे खासगी दाैऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.