कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कोळेवाडी-उंडाळे जोड रस्त्यालगत केबल टाकण्यासाठी केलेल्या खोदकामामुळे रस्त्याचे मोठे नुकसान झाले आहे. पन्नास-शंभर फुटांच्या अंतरावर आठ-दहा फूट खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. परिणामी, पावलो-पावली अपघाताचा धोका निर्माण झाला असल्याने, स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पंधरा दिवसांपासून कोळेवाडी-उंडाळे जोड रस्त्यालगत एका खासगी कंपनीची केबल टाकण्याचे काम सुरू आहे. रस्त्याच्या साइट पट्टीवर जेसीबीच्या साह्याने चर खोदून पाइप टाकण्यात येत आहे. मात्र, चर खोदून काढलेली माती रस्त्यावरच टाकली जात असल्याने, वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. हा मार्ग डोंगरी भागातून जात असल्याने अनेक ठिकाणी छोटे-मोठे फरशी पूल आहेत. पावलोपावली वळणे आणि खडकाळ जमीन असल्याने, चर खोदण्यास अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी, चर खोदून केबलसाठी जलवाहिनी टाकण्यात येत असली, तरी खडकाळ, पुलाच्या आणि वळणावरती अर्धवट स्थितीत चर खोदून तशाच आहेत. त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.
या मार्गावरील काही गावातून हा रस्ता जात असल्याने, या खोदलेल्या चरीचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. संथ गतीने काम सुरू असल्याने व ऐन पावसाळ्यात खोदकाम केले जात असल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या दिरंगाई कामामुळे नागरिकांसह वाहनधारकांना होणाऱ्या त्रासातून बाहेर काढण्यासाठी लोकप्रतिनिधी लक्ष घालणार का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
चौकट :
अनेक दुचाक्या नाल्यात
या मार्गावरील कोळेवाडी आणि तुळसण गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डोंगरात चार ते पाच ठिकाणी स्टोन क्रशर सुरू आहेत. त्यामुळे या मार्गावर अवजड वाहनांचा सतत राबता सुरू आहे. चर खोदून काढलेली माती रस्त्यावर टाकल्याने रस्ता अरुंद झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. परिणामी, खडीचे अवजड डम्पर समोरून आल्यास दुचाकीसह लहान चारचाकी वाहनांना पुढे जाण्यासाठी रस्ता नसल्याने अनेकदा मागे-पुढे करून पार करावा लागत आहे. मोठी वाहने समोरून आल्याने अनेकदा रस्त्याअभावी दुचाकी चालकांचे नाल्यात जाऊन लहान-मोठे अपघात झाले आहेत. यात एखाद्याचा जीव जाऊ नये, एवढीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चौकट :
जेसीबी चालकांची अरेरावी
चरीचे खोदकाम करताना, अनेकदा जेसीबी ऑपरेटर संपूर्ण रस्त्यावर ताबा घेऊन तासन् तास वाहतूक बंद करत आहेत. यावेळी एखाद्या वाहन चालक अडथळ्यासंदर्भात काही बोलल्यास अरेरावीची भाषा करत आहेत. संपूर्ण रस्ताच मालकीचा असल्याच्या आविर्भावात आहेत. त्यांना कोणाचेही भय दिसून येत नाही.