कण्हेरसह लिंब आरोग्य केंद्रास अत्याधुनिक रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:26 IST2021-07-20T04:26:39+5:302021-07-20T04:26:39+5:30

किडगाव : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेची चाहूल प्रशासनाच्या मार्फत दिली जात आहे. अशाच बिकट परिस्थितीत रुग्णांना ...

State-of-the-art ambulance to Limb Health Center with Kanher | कण्हेरसह लिंब आरोग्य केंद्रास अत्याधुनिक रुग्णवाहिका

कण्हेरसह लिंब आरोग्य केंद्रास अत्याधुनिक रुग्णवाहिका

किडगाव : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेची चाहूल प्रशासनाच्या मार्फत दिली जात आहे. अशाच बिकट परिस्थितीत रुग्णांना वेळेत औषध उपचार मिळावेत यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने कण्हेर व लिंब प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे नुकतेच वाटप करण्यात आले.

कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत २२ ते २५ गावांचा समावेश होतो. या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणारी काही गावे अतिदुर्गम भाग म्हणून ओळखली जातात. त्यामुळे त्या ठिकाणी रुग्णांना आणण्यासाठी आणि पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिकेचा वारंवार वापर करण्यात येतो. मात्र रुग्णवाहिका जुनी झाल्याने वारंवार बंद पडत होती. रुग्णांच्या सेवेमध्ये खंड पडत होता हे ओळखून जिल्हा परिषदेचे लिंब गटाचे सदस्य प्रतीक कदम यांच्या प्रयत्नातून या कण्हेर व लिंब प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी दोन अत्याधुनिक रुग्णवाहिका मिळविण्यात यश मिळविले.

या रुग्णवाहिकेमुळे परिसरातील रुग्णांना वेळेत औषधोपचार मिळू शकणार आहेत. तसेच प्रसूतीपूर्व आणि प्रसूती नंतर मातांना आणण्यासाठी आणि घरी पोहोचविण्यासाठी या रुग्णवाहिकेचा वापर केला जाणार आहे. तसेच कोरोना काळात रुग्णांपर्यंत औषधांचा मुबलक पुरवठा वेळेत होण्यासाठी या रुग्णवाहिका वापरण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या चौदाव्या वित्त आयोगातून या अत्याधुनिक रुग्णवाहिकेची खरेदी करण्यात आली.

कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचे पूजन जिल्हा परिषद सदस्य प्रतीक कदम, आरोग्य अधिकारी सुदर्शन मेहता, जिल्हा परिषद सदस्य अनिता चोरगे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तर लिंब प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या माजी सभापती वनिता गोरे, पंचायत समिती सदस्य जितेंद्र सावंत, पंचायत समितीचे सदस्य राहुल शिंदे, दयानंद उघडे, डॉ. अरुण पाटोळे, रामदास सोनमळे यांच्या उपस्थितीत झाले.

Web Title: State-of-the-art ambulance to Limb Health Center with Kanher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.