प्रतापगडाच्या तटबंदी, बुरुजाचे काम ताबडतोब सुरू करा, नितीन शिंदे यांची मागणी 

By दीपक देशमुख | Published: January 4, 2024 04:11 PM2024-01-04T16:11:39+5:302024-01-04T16:12:06+5:30

शिवप्रताप शिल्प बसवण्याच्या नियोजित जागेची पाहणी

Start work on Pratapgarh fortifications, bastion immediately, Nitin Shinde demand | प्रतापगडाच्या तटबंदी, बुरुजाचे काम ताबडतोब सुरू करा, नितीन शिंदे यांची मागणी 

प्रतापगडाच्या तटबंदी, बुरुजाचे काम ताबडतोब सुरू करा, नितीन शिंदे यांची मागणी 

सातारा : किल्ले प्रतापगडावर शासन शिवप्रतापाचे भव्य शिल्प उभा करत आहे परंतु, या किल्ल्याच्या बुरुजाचे ढाचे, तटबंदी ठिकठकाणी ढासळत आहे. गडाला मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. पायऱ्या मोडकळीस आलेल्या आहेत. मुख्य बुरुजही अर्धा ढासळला आहे. याची ताबडतोब दखल घेऊन सरकारने डागडुजीसाठी रायगडप्रमाणेच ५०० कोटींचा निधी उपलब्ध करुन प्रतापगडास गतवैभव प्राप्त करुन द्यावे, अशी मागणी श्रीशिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली.

नितीन शिंदे व भाजप महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस ॲड. स्वाती शिंदे यांच्यासह शिष्टमंडळाने प्रतापगड येथील शिवप्रतापाचे शिल्प बसविण्यात येणाऱ्या जागेची पाहणी केली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य पराक्रमाचे शिल्प कसे उभे राहील, शिवप्रतापाच्या शिल्पाचा चबुतरा किती लांबी व रुंदीचा असेल त्याचबरोबर त्या शिल्पाच्या पाठीमागील बाजूस संपूर्ण प्रतापगड येतो का याची पाहणी केली.

या चबुतराची उंची आठ फुट व अफझलखान वधाचे (शिवप्रतापाचे) शिल्प अठरा फुट असल्याची माहिती नितीन शिंदे यांनी दिली. यानंतर शिंदे यांनी प्रतापगडाचीही पाहणी केली. यावेळी ठिकठिकाणी बुरुज व तटबंदीच्या दुरुस्तीची गरज असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

यानंतर माध्यमांशी बोलताना नितीन शिंदे म्हणाले, स्वराज्याचा शत्रू अफझलखानाच्या वधाची व्युहरचना जिथे आखली, आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये अफजलखानाच्या वधाची शपथ छत्रपती शिवरायांनी घेतली, खंडोजी खोपडेचा चौरंग केला तो प्रतापगड टिकावा, यासाठी सरकारने ताबडतोब दखल घेवून किल्ल्याच्या डागडुजीसाठी निधी उभा करावा. अन्यथा व्यापक आंदोलन करू, असा इशारा शिंदे यांनी दिला.

याप्रसंगी गजानन मोरे, चेतन भोसले, प्रतापगड येथील आनंदराव उतेकर, अभय हवलदार, महाबळेश्वर शिवसेना शहर प्रमुख विजय भाऊ नायडू, उपशहर प्रमुख सचिन गुजर, अजय बावळेकर, दिनेश बावळेकर, मोझर आदी तसेच शिवप्रेमी उपस्थित होते.

Web Title: Start work on Pratapgarh fortifications, bastion immediately, Nitin Shinde demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.