खडी पडली... डांबर बसलं!--लोकमतचा दणका
By Admin | Updated: December 2, 2014 00:17 IST2014-12-01T22:55:07+5:302014-12-02T00:17:41+5:30
‘लोकमत’च्या वृत्तानंतर प्रशासन कामाला : गावोगावच्या रस्त्यांवर खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर

खडी पडली... डांबर बसलं!--लोकमतचा दणका
सातारा : दळणवळणाच्या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक धोकादायक बनत आहे. निवेदने देऊनही संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांना खाचखळग्यातूनच प्रवास करावा लागत होता. मात्र, ‘लोकमत’मध्ये याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच खडबडून जागे झालेल्या बांधकाम विभागाने ठिकठिकाणी रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
पावसामुळे खड्डे मुजविणे अवघड होते. त्यामुळे आता ते काम हाती घेतले आहे. सुरक्षित प्रवासासाठी रस्त्यांची डागडुजी केली जात आहे.
- आर. डी. पाटील,
शाखा अभियंता, बांधकाम विभाग, सातारा
वाढे-शिवथर रस्त्याचे डांबरीकरण
शिवथर : वाढे ते शिवथर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहन चालविणे मुश्किल बनले होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर बांधकाम विभागाने दखल घेऊन तातडीने डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे.
पावसाळ्यात वाढे ते शिवथर या मार्गावर रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. टोल चुकविण्यासाठी या मार्गावरून कंटेनरसारखी अवजड वाहनेही जात होती. त्यामुळे रस्ता खराब झाला होता. बांधकाम विभागाने खडी, डांबर, मुरुम यांनी खड्डे भरून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
गोपूज-पुसेसावळी रस्त्याची डागडुजी
औंध : वडूज-कऱ्हाड या राज्य मार्गावरील गोपूज ते पुसेसावळीपर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला होता. याबाबत ‘खड्डे चुकविताना होतायत अपघात’ मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच बांधकाम विभागाने रस्त्याची डागडुजी सुरू केली आहे. गोपूज ते पुसेसावळी हा रस्ता रहदारीचा असल्याने खड्ड्यांमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र, सध्या युद्धपातळीवर रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
शिंगणापूर-म्हसवड रस्ता दुरुस्तीला गती
पळशी : शिंगणापूर-म्हसवड रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने वाहनधारकांसह ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गुप्तलिंग येथील वळणावर मोठा खड्डा पडल्याने वाहने खड्ड्यात आदळत होती. तसेच शिंगणापूर ते मार्डी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे वाहतूक धोकायदायक बनली होती. शंभूमहादेवाच्या दर्शनासाठी पंढरपूर, आटपाडी, सांगोला, म्हसवड, पिलीव या भागातील भाविक येत असतात. खराब रस्त्यामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागत होता. बांधकाम विभागाने खड्डे मुजविण्याचे काम हाती घेतल्याने समाधान व्यक्त होत आहे.
या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे फुकटचे दुखणे घेण्यासारखे होते. गाड्यांचे नुकसान व्हायचे. मात्र, रस्ता दुरुस्तीमुळे हे नुकसान टळणार आहे.
- महादेव दोलताडे,
शिक्षक