एसटी तीच, ठिकाणबी तेच.. पुन्हा बंद पडली..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:14 IST2021-02-06T05:14:58+5:302021-02-06T05:14:58+5:30

कातरखटाव : खटाव तालुक्यातील वडूज आगाराच्या नियोजनशून्य व ढिसाळ कारभारामुळे एसट्या कुठेही बंद पडायला लागल्या आहेत. त्याचं झालं असं ...

ST same, same place .. closed again ..! | एसटी तीच, ठिकाणबी तेच.. पुन्हा बंद पडली..!

एसटी तीच, ठिकाणबी तेच.. पुन्हा बंद पडली..!

कातरखटाव : खटाव तालुक्यातील वडूज आगाराच्या नियोजनशून्य व ढिसाळ कारभारामुळे एसट्या कुठेही बंद पडायला लागल्या आहेत. त्याचं झालं असं वडूज आगाराची वडूज-कान्हरवाडी एसटी (एमएच १२ ईएफ ६८९७) ही एसटी वडूज, कातरखटाव, एनकूळ, खातवळ, कान्हरवाडी फेऱ्या करीत असते. १ तारखेला वडूजमधून प्रवासी घेऊन निघाली आणि कातरखटाव थांब्यावर साडेपाच वाजता बंद पडली अन् प्रवाशांचे हाल झाले. आज तोच प्रकार पुन्हा गुरुवारी (दि. ४) हीच लालपरी दुपारी दीड वाजता वडूज डेपोतून निघाली पुन्हा त्याचं ठिकाणी कातरखटाव बसथांब्यावर येऊन बंद पडली. त्यामुळे नेहमीप्रमाणे ‘चलो उतरो यार धक्का मार,’ या खेळामुळे प्रवासी व ग्रामस्थांमध्ये खुमासदार चर्चेचा विषय बनला.

लॉकडाऊन काळात गेली सात महिने एसटीची चाकं बंद होती. परंतु गेल्या महिनाभरापासून प्रवाशांच्या सेवेसाठी असणाऱ्या एसटीची चाकं फिरायला लागली असलीतरी आज इथे ब्रेक निकामी तर उद्या तिथे, कधी स्टार्टर लागेना तर कधी बॅटरीला करंट येईना. चालक, वाहकांचे हाल, दिवसभर सुटी नाही. कितीही उशीर होऊ द्या एसटीच्या फेऱ्या पुऱ्या करायच्याच; परंतु एसट्या प्रत्येक गावात, खेड्यापाड्यात वेळेवर गेल्या तरच एसटीला प्रवासी भेटतील. एसटीचं जर दोन-दोन तास उशीर झाला तर प्रवासी थांबतील का.. आणि परत म्हणायचे एसटी महामंडळ तोट्यात आहे. अशा या वडूज आगाराच्या गचाळ कारभारामुळे घरी परतणाऱ्या शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना व ज्येष्ठ नागरिकांना दोन ते तीन तास रखडपट्टीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

प्रतिक्रिया :

एनकूळला निघालोय आत्ता काय करायचं तिकीट काढून बसलोय. अडकून बसलोय, चालू होईल तेव्हा जायचं, हे काय आम्हाला नवीन नाही. वडूज आगाराची नेहमीचाच प्रकार आहे.

-मुकुंदराव खाडे, प्रवासी एनकूळ

प्रतिक्रिया :

बंद पडलीय ढकलून बघितली चालू होईना, मागं ढकलली.. पुढं ढकलली स्टार्टर लावून बघितलं चालू होतं नाही. आपोआप बंद पडत आहे. प्रवाशांनी तिकीट काढलेले असतात, त्यांचे बोलणे खावे लागतेय. काय करायचं.

- विलास मदने, एसटी चालक

०५कातरखटाव

फोटो ओळ : वडूज आगारातील वडूज-कान्हरवाडी बसचा ब्रेक निकामी झाल्याने पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. (छाया : विठ्ठल नलवडे)

Web Title: ST same, same place .. closed again ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.