घोरपडीची शिकार; एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:41 IST2021-05-21T04:41:51+5:302021-05-21T04:41:51+5:30
औंध : घोरपडीची शिकार केल्याप्रकरणी वनविभागाने नांदोशी येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर ...

घोरपडीची शिकार; एकास अटक
औंध : घोरपडीची शिकार केल्याप्रकरणी वनविभागाने नांदोशी येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवार, दि. १९ रोजी नांदोशी येथील दिनकर धोंडू शिंदे यांनी नांदोशी हद्दीत दोन घोरपडींची शिकार करून त्या स्वतःच्या घरी आणून ठेवल्याची माहिती वनविभागास मिळाली होती. वनक्षेत्रपाल शीतल फुंदे, वनपाल रामदास घावटे, वनरक्षक बिरु जावीर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता दिनकर शिंदे यांच्या स्वयंपाकघरात दोन मृत घोरपडी आढळून आल्या. त्यात एक सोललेल्या अवस्थेत, तर एकाचे मांस तयार केलेले आढळून आले.
संशयित आरोपी दिनकर शिंदे याच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली. गुरुवारी त्याला वडूज येथील न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची वनकोठडी सुनावली. या घटनेचा तपास सातारा उपवनसंरक्षक एम. एन. मोहिते, सहायक वनसरक्षक एस. बी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल शीतल फुंदे करीत आहेत.