पसरणी गावाने देशाला थोर व्यक्ती दिल्या

By Admin | Updated: May 24, 2016 00:56 IST2016-05-23T22:35:59+5:302016-05-24T00:56:30+5:30

पृथ्वीराज चव्हाण : विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी गौरवोद्गार; केंद्रातील सरकारकडून जातीयतेचे राजकारण

The spreading town has given a great person to the country | पसरणी गावाने देशाला थोर व्यक्ती दिल्या

पसरणी गावाने देशाला थोर व्यक्ती दिल्या

वाई : ‘पसरणी गावाने पद्मश्री बी. जी. शिर्के व पद्मश्री शाहीर साबळे यांच्या रूपाने थोर व्यक्ती देशाला दिल्या आहेत. त्यांच्या विचाराचा वारसा जपत गावातील तरुण ‘नवतरुण विकास आघाडी’च्या माध्यमातून गावची एकी व गावपण जपत कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली. ज्यांच्यामुळे विकास कामे मार्गी लागली त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही भावना समाजात लोप पावली असताना आता मुख्यमंत्री वा कोणत्याही उच्च पदावर नसताना पसरणीकरांनी केलेल्या सन्मानामुळे मी भारावून गेलो आहे,’ असे भावनिक मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
पसरणी, ता. वाई येथे विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, नंदकुमार खामकर, आरपीआय जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, जिल्हा परिषद सदस्या राधाताई शिंदे, विजय भिलारे, विकास शिंदे, रतन शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
चव्हाण म्हाणाले, ‘या देशाचा विकास हा लोकशाही मार्गानेच झाला असून, आगामी काळात समतावादी विचाराने सर्वधर्म मानणाऱ्या पक्षांनी एकत्रित येऊन लोकशाही बळकट करावी लागणार आहे. देशातील केंद्राच्या सरकारकडून जातीयतेचे राजकारण चालले असून, केंद्र व राज्य सरकार दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कमी पडत आहे. मुख्यमंत्री असताना जिल्ह्यातील अनेक विकास कामे मार्गी लावली. त्यावेळी पसरणीच्या नवतरुण विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जी कामे सुचविली त्याला मंजुरी दिली; पण आता मी मुख्यमंत्री वा कोणत्याही उच्चपदावर असताना झालेल्या कामाबद्दल त्यांनी जी कृतज्ञता व्यक्त करून जो सन्मान केला त्यातून मी भारावून गेलो.’
मदन भोसले म्हणाले, ‘आजकाल परिस्थिती फार वेगळी आहे. जे जनतेची कामे करतात ते काहीच बोलत नाहीत. आज खोट्या कामाचे श्रेय घेणारी मंडळी जास्त आहेत. ज्यांनी काम केलं त्यांचा मान राखनं हा चांगुलपणा पसरणीकरांमध्ये आहे. १३ वर्षांपूर्वी आजारी असणारा किसन वीर कारखाना ऊर्जितावस्थेत आणून प्रतापगडसह खंडाळा कारखान्यातून आज साखर निर्मिती होऊ शकली आहे.
यावेळी आनंदराव पाटील, अशोकराव गायकवाड, दिलीप वाडकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास किसन भिलारे, स्वप्नील बगाडे, नगरसेवक सचिन फरांदे, महेंद्र धनवे, चंद्रकांत चव्हाण, रोहिदास पिसाळ, प्रवीण जगताप, अजित खामकर, विजय शिंदे आदींची व पसरणी परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

... तर गावाचा शाश्वत विकास साधता येईल
‘पद्मश्री बी. जी. शिर्के यांचे व माझे अतिशय घनिष्ठ संबंध होते. मी ही त्याकाळी इंजिनिअर असल्यामुळे अनेक कामात त्यांच्याशी चर्चा करत असे. त्यांच्या बोलण्यात नेहमी गावच्या नवतरुणांनी जोपासून आपापल्या गावचा विकास आराखडा तयार करावा म्हणजे अनेक कामे क्रमाने मार्गी लागतील व शाश्वत विकास साधता येईल,’ असे आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

Web Title: The spreading town has given a great person to the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.