क्रीडा स्पर्धांमुळे संघभावना वाढीला लागते
By Admin | Updated: January 9, 2015 00:05 IST2015-01-08T21:33:05+5:302015-01-09T00:05:52+5:30
जिल्हाधिकारी : जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धांना सुरुवात

क्रीडा स्पर्धांमुळे संघभावना वाढीला लागते
सातारा : ‘जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धांचा उपक्रम कौतुकास्पद आहे, अशा उपक्रमांद्वारे संघभावना वाढीस प्रोत्साहन मिळते,’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी गुरुवारी येथे केले.
छत्रपती शाहू क्रीडा संकुलात गुरुवारपासून सुरू झालेल्या जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धांचे मुदगल यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषेदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे, शिक्षण सभापती अमित कदम, महिला व बालकल्याण सभापती कल्पना मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांंत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी कोहिनकर आदी उपस्थित होते.मुदगल म्हणाले, ‘दररोजच्या कामातील ताणतणाव दूर करण्याच्या दृष्टीने क्रीडा स्पर्धा उपयुक्त ठरतात; तसेच कामासाठी नव्याने उत्साह येतो. सर्वांनी खेळाडूवृत्तीने भाग घेऊन स्पर्धा यशस्वी कराव्यात.’
जी. श्रीकांत म्हणाले, ‘जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेची खंडित झालेली परंपरा आपण पुन्हा सुरू करीत आहोत. यापुढेही या स्पर्धा कायमस्वरूपी सुरू राहण्यास आपण सर्वांनी मिळून दक्षता घेतली पाहिजे. त्यासाठी आवश्यक तेवढी आर्थिक तरतूद करण्याचा प्रयत्न केला जाईल. (प्रतिनिधी)