तमाशा बंद; पण लोककला जिवंत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:38 IST2021-05-23T04:38:27+5:302021-05-23T04:38:27+5:30
तमाशात ढोलकीची थाप आणि घुंगरांचा नाद कलावंतांना जगण्याचं बळ देतो. मात्र, गत वर्षभरापासून ढोलकी स्तब्ध आणि घुंगर अबोल आहेत. ...

तमाशा बंद; पण लोककला जिवंत!
तमाशात ढोलकीची थाप आणि घुंगरांचा नाद कलावंतांना जगण्याचं बळ देतो. मात्र, गत वर्षभरापासून ढोलकी स्तब्ध आणि घुंगर अबोल आहेत. कोरोनामुळे गर्दीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, सलग दोन वर्षे यात्रा साधेपणाने साजऱ्या झाल्या. गावोगावच्या यात्रा लोककलावंतांच्या उपजीविकेचे साधन असतात. यात्रांमध्ये तमाशाला हमखास मागणी होते आणि तमाशा सादर करून लोककला जपण्याबरोबरच कलावंत आपला उदरनिर्वाह चालवितात. मात्र, दोन वर्षांपासून सर्वकाही ठप्प आहे. तमाशा कलावंतांच्या हाताला काम नाही, इतर कामे करून हे कलावंत आपली गुजराण करताहेत. मात्र, काही कालावधीनंतर हे संकट टळेल आणि पूर्ववत तमाशाचे फड रंगतील, असा विश्वास या कलावंतांना आहे. त्यामुळे त्यांनी सराव थांबविलेला नाही. गायक, वादक आणि नृत्यांगणा आपापल्या घरी वेळ मिळेल तेव्हा सराव करीत आहेत. त्या माध्यमातून आपल्यातील कला जिवंत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
दिवसातील ठरावीक वेळी कलावंत सराव करतात. त्याबरोबरच उपजीविकेसाठी वेगवेगळे व्यवसायही त्यांनी निवडले आहेत. सद्य:स्थितीत हे व्यवसायच त्यांना जगण्याचे बळ देत आहेत. मात्र, जगण्याबरोबरच कला जिवंत ठेवण्यासाठीही कलावंतांचा प्रयत्न सुरू असून, तो निश्चितच प्रेरणादायी आहे.
- संजय पाटील
फोटो : २२केआरडी०४
कॅप्शन : प्रतीकात्मक