दारूबंदीच्या फेरविचारासाठी मेढ्यात आज विशेष ग्रामसभा
By Admin | Updated: August 25, 2014 22:52 IST2014-08-25T21:20:36+5:302014-08-25T22:52:16+5:30
अजब तर्कशास्त्र : म्हणे अवैध मार्गाने दारू येतेच, तर दुकाने बंद का?

दारूबंदीच्या फेरविचारासाठी मेढ्यात आज विशेष ग्रामसभा
मेढा : दारूमुक्त तालुका असा लौकिक प्राप्त करूनही जावळी तालुक्यात अवैध मार्गाने दारू येतच आहे, तर मग वैध दुकाने का नकोत, असा अजब सवाल उपस्थित करून काहीजणांनी वैध दारू दुकाने सुरू करण्याची मागणी केली आहे. यावर निर्णय घेण्यासाठी मंगळवारी (दि. २६) विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली असून, दारूबंदीच्या समर्थकांचा त्याला तीव्र विरोध आहे.
दारूबंदी चळवळीतील कार्यकर्ते आणि रणरागिणींच्या अथक प्रयत्नांतून पाच गावांतील १३ दारू दुकाने बंद करून जावळी तालुक्याने इतिहास रचला. त्यानंतर अवैधरीत्या दारू येत राहिली ती पोलीस, उत्पादनशुल्क विभाग आणि काही राजकीय नेत्यांच्या स्वार्थामुळे. दारूबंदीचा निर्णय मात्र ग्रामसभेत झालेला होता. आता अवैध दारूविक्री सुरू आहेच, तर वैध दुकाने का नकोत, असा सवाल उपस्थित करीत ग्रामसभा बोलावण्यात आली आहे. कधी नव्हे ते ग्रामसभेची सूचना देणारे फ्लेक्स फलक झळकले आहेत. महिलांच्या मतदानाने झालेली दारूबंदी उठविण्यासाठी बोलावलेली ही विशेष ग्रामसभाच बेकायदेशीर असून, त्याविरोधात आम्ही न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे दारूबंदी महिला कमिटी आणि व्यसनमुक्त युवक संघाने म्हटले आहे. असे असले तरी ग्रामस्थ, महिलांनी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहून दारूबंदीचा इतिहास कायम ठेवावा, असे आवाहनही संघाने केले आहे.
नऊ डिसेंबर २००७ रोजी मेढा येथे महिलांचे मतदान होऊन मेढा गावातील दोन देशी दारू दुकाने, दोन बिअर बार, एक बिअर शॉपी, एक ताडी-माडी दुकान बंद करण्यात आले. यानंतर दारूविक्रेत्यांनी मुंबई येथे उत्पादनशुल्क विभागाच्या आयुक्तांकडून २० मार्च २००८ रोजी दारूबंदीला स्थगिती मिळविली. यानंतर मेढा येथील दारूदुकाने सुरू झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना देऊन मेढा ग्रामपंचायत कार्यालयाजवळ शंखनाद आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या अॅड. वर्षा देशपांडे यांच्यासमवेत मेढ्यातील महिलांचे शिष्टमंडळ घेऊन व्यसनमुक्त संघाचे कार्यकर्ते उत्पादनशुल्क मंत्री गणेश नाईक यांना भेटले. परंतु त्यांनी आयुक्तांच्या निर्णयास स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानंतर सातारा येथील कार्यक्रमास येणाऱ्या शरद पवार यांना काळे झेंडे दाखविण्याचे आंदोलन महिलांनी जाहीर केले. या आंदोलनाचा धसका घेऊन ११ एप्रिल २००८ रोजी दारू दुकाने सुरू करण्याच्या निर्णयाला गणेश नाईक यांनी स्थगिती दिली व मेढ्यातील दारूबंदी दुसऱ्यांदा यशस्वी झाली.
‘पिचलेल्या महिला वारंवार आंदोलने करू शकत नाहीत. परंतु भावी पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ग्रामस्थांनी व महिलांनी एकत्र येऊन नतद्रष्टांनी स्वार्थासाठी दारू दुकाने सुरू करण्याचा चालविलेला प्रयत्न हाणून पाडावा,’ असे आवाहन व्यसनमुक्त युवक संघाने केले आहे. (प्रतिनिधी)
दारूबंदी होऊनही अवैध मार्गाने दारू येतच आहे, तर दारूबंदीचा फेरविचार करण्यासाठी विशेष ग्रामसभा घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनीच ग्रामसभेत केली होती. दारूबंदीला वर्ष झाल्यानंतर ती कायम ठेवायची नसेल, तर ग्रामसभाच घ्यावी लागते. त्यामुळे ही सभा बोलावण्यात आली आहे. दारूबंदी उठवायची की कायम राखायची हा निर्णय ग्रामस्थांनीच घ्यायचा आहे. दोन्ही पर्याय ग्रामस्थांसमोर खुले असतील. त्यातून त्यांनीच निवड करावी.
- सुजीत जवळ, सरपंच, मेढा