सोयाबीन बियाण्यांच्या किमतीत दुपटीने वाढ
By Admin | Updated: June 8, 2014 00:52 IST2014-06-08T00:49:12+5:302014-06-08T00:52:44+5:30
शेतकरी हवालदिल : क्षेत्र कमी झाल्याने उत्पादन घटण्याची शक्यता

सोयाबीन बियाण्यांच्या किमतीत दुपटीने वाढ
कोपर्डे हवेली : खरीप हंगामातील तीन महिन्यांचे पीक म्हणून शेतकरी सोयाबीनचे उत्पादन घेतात. वेगवेगळ्या जातींची प्रमाणित केलेली बियाणे वापरून जादा उत्पादन काढण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोयाबीन बियाण्यांच्या किमतीत दुपटीने वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा असून, कंपनीने सोयबीनच्या बियाण्यांमध्ये दुपटीने वाढ केली आहे. महागडे बियाणे परवडत नसल्यामुळे अनेक शेतकरी वेगळी पिके घेण्याच्या तयारीत आहेत.
सोयाबीन बियाण्याची पेरणी करून उत्पादन घेण्यासाठी एकरी ४० किलो बियाणे लागते. गेल्यावर्षी वेगवेगळ्या जातींच्या बियाण्यांची किंमत ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो होती. यावर्षी मात्र ९० रुपयांपासून १०५ रुपयांपर्यंत दर आहे. त्यामुळे एकरी बियाणे खरेदी करण्यासाठी सुमारे चार हजार रुपये खर्च येत आहे. जे. एस. ३३५ जातींच्या बियाण्यांची २५ किलोची किंमत २७०० रुपये आहे. रोहित सिड्स कंपनीचे ३० किलोची किंमत २७०० रुपये आहे. सुमारे ९० पासून १०५ रुपये एक किलोची किमती आहेत.
बाजारपेठेत सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवत असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. बियाणे मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. (वार्ताहर)