कोपर्डे हवेली : गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने आणि सध्या सोयाबीन, भुईमूग या पिकांच्या फुले येण्याचा आणि शेंगा भरण्याचा कालावधी असल्याने पाण्याची गरज निर्माण झाली असून, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. खरीप हंगामात जिरायती क्षेत्रावर सोयाबीन, भुईमूग या पिकाची शेतकरी मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. सोयाबीन काढणी केल्यानंतर रब्बी हंगामात शाळू पीक घेता येते.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाने सोयाबीन पीक जोमदार येऊन शेंगा लागण्यास सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी सोयाबीन, भुईमूग पिकाला फुले आली आहेत. पावसाने ओढ दिल्याने शेंगा भरण्यावर मर्यादा येणार असून, उत्पादनात घट होण्याचा शेतकरी अंदाज व्यक्त करत आहेत. सध्या सोयाबीन भुईमूग पिकाला पावसाची गरज आहे. बरेचसे क्षेत्र पावसावर अवलंबून आहे. ज्या शेतकऱ्यांची पिकाला पाणी देण्याची सोय आहे त्यांनी पाणी देण्यास सुरुवात केली आहे. पण ज्या शेतकऱ्यांकडे पाणी देण्याची सोय नाही, ते मात्र पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
चौकट.....
कऱ्हाड उत्तर विभागातील पूर्वेकडच्या विभागातील जिरायती क्षेत्रावर सोयाबीन भुईमूग पिकाचे क्षेत्र मोठे असल्याने जादा क्षेत्र पावसावर अवलंबून आहे. बागायती क्षेत्रावर असणाऱ्या सोयाबीनला शेतकऱ्यांनी पाणी देण्यास सुरुवात केली आहे.
फोटो ओळ....
वडोली निळेश्वर (ता. कऱ्हाड) येथील सोयाबीन पीक जोमदार आले असून, सध्या शेंगा भरत असल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.