कास परिसरात भात, नाचणीच्या पेरणीस सुरुवात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:29 IST2021-06-04T04:29:45+5:302021-06-04T04:29:45+5:30
या परिसरातील शेतकरी डिसेंबर, जानेवारी महिन्यात झाडांच्या फांद्या तोडून त्यांच्या मोळ्या मोठ्या प्रमाणावर बांधून कवळे करतात. होळीच्या सणानंतर शेतकरी ...

कास परिसरात भात, नाचणीच्या पेरणीस सुरुवात!
या परिसरातील शेतकरी डिसेंबर, जानेवारी महिन्यात झाडांच्या फांद्या तोडून त्यांच्या मोळ्या मोठ्या प्रमाणावर बांधून कवळे करतात. होळीच्या सणानंतर शेतकरी वावरामध्ये जेथे तरव्याची भाजणी करावयाची आहे, त्या ठराविक ठिकाणच्या जमिनीवर सर्वात खाली शेणाचा थर अंथरून त्याच्यावर कवळे पसरवतात. त्यावर झाडाचा पालापाचोळा, जनावरांचे वाया गेलेले गवत तसेच थोड्या प्रमाणावर माती टाकून सकाळी लवकर तरवा करतात. त्यानंतर हा तरवा दुपारी उन्हात पेटवून दिला जातो. या तरव्यावर पावसाला सुरुवात होताच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भात, नाचणीच्या बियाणांची पेरणी करण्यात येते. माॅन्सूनपूर्व पावसाने जमिनीत ओलावा असल्याने कुदळीच्या साह्याने भात, नाचणीच्या बियाणांची पेरणी करण्यास सुरुवात झाली आहे. प्रथमत: तरव्याच्या भाजणीच्या जमिनीवर भात, नाचणीची बियाणे हातात घेऊन फूक मारून पेरल्यानंतर कुदळीच्या साह्याने कुदळवून त्यावर माती टाकून सपाट केले जाते. तसेच काही ठिकाणी भातपेरणीसाठी कुदळीने काकरी ओढून त्यात भात बियाणे पेरून त्यावर माती टाकून सपाट केले जात आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी नाचणी व भात लावणीसाठी भाताचे, नाचणीचे रोप तयार करण्यात येते.
चौकट
तरव्याच्या भाजण्या केल्यामुळे रोपांमधील तणांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. तसेच रोपांची वाढसुध्दा चांगली होते. साधारणतः रोपे एक महिन्यांची झाल्यावर तसेच भरपूर पाणीसाठा असल्यावर पावसाळ्यात शेतकरी खाचरात चिखल करून पारंपरिक पद्धतीने भाताची लावणी करतात. त्याच दरम्यान नाचणीच्या रोपांची देखील लागण करतात.
कॅप्शन ०३कास
कास परिसरात जमिनीत थोडाफार ओलावा झाल्याने भात, नाचणीच्या पेरणीस सुरुवात करण्यात आली आहे. (छाया -सागर चव्हाण )