स्मृतिसदनाभोवतालचा बगीचा लवकरच बहरणार!
By Admin | Updated: November 20, 2015 00:06 IST2015-11-19T21:51:16+5:302015-11-20T00:06:53+5:30
बागेचे काम प्रगतिपथावर : बगीचा परिसरात ट्रान्सफॉर्मर बसविण्याबाबत मासिक सभेत होणार निर्णय; निसर्ग, पर्यटन विकास योजनेतून निधी

स्मृतिसदनाभोवतालचा बगीचा लवकरच बहरणार!
कऱ्हाड : येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनाभोवतालच्या बंद अवस्थेत असलेल्या बगीच्याच्या कामाला आता सरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत स्मृतिसदनाचा बगीचा बहरणार आहे. यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनाच्या इमारतीचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, स्मृतिसदन परिसरातील बागेचे काम मात्र १२ वर्षांपासून रखडलेले होते. आता रखडलेल्या बगीच्याच्या डागडुजीच्या कामास सुरुवात झाली असून, ते प्रगतिपथावर आहे. त्यामुळे शहरवासीयांमधून समाधान व्यक्त होत आहे.निसर्ग, पर्यटन विकास योजनेअंतर्गंत शहरातील स्मृतिसदनालगत असलेला बगीचा विकसित करण्याचा निर्णय कऱ्हाड पालिकेच्या वतीने घेण्यात आला. त्यातून निसर्ग पर्यटन विकासाच्या निधीमधून सुमारे ७७ लाखांची कामे प्रास्तावित करण्यात आली. या कामांमध्ये लॉन , विद्युतीकरण, खेळणी, संरक्षक भिंतीची रंगरंगोटी, आकर्षक झाडांची लागवड त्यास पाण्याची उत्तम व्यवस्था आदी कामांचा समावेश या प्रास्तावित कामांमध्ये करण्यात आला आहे. त्यानुसार सध्या बगीच्याच्या डागडुजीच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.उद्यानाच्या कामास जानेवारी २००३ मध्ये प्रारंभ झाला. त्यानंतर काही दिवस काम सुरू राहिले. मात्र, अनेक वर्षांपासून काम बंद अवस्थेत होते. स्मृतिसदनाच्या नूतनीकरणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या पाच कोटी निधीमुळे नूतनीकरणाच्या कामास सुरुवात झाली.आता नुकतेच स्मृतिसदनाभोवतालच्या उद्यानाचे काम सुरू करण्यात आले आहे. सध्या जेसीबी तसेच ट्रॅक्टरच्या साह्याने उद्यानातील माती काढण्याचे काम केले जात आहे. तसेच पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासह लॉनचीही डागडुजी केली जात आहे. यामध्ये उद्यानातील पूर्वीचे असलेले लॉन हे यंत्राद्वारे काढण्यात आले असून, त्या जागी नवीन लॉन तयार केले जात आहे. स्मृतिसदनाभोवताली पूर्ण उद्यान न करता काही भाग पार्किंगसाठी ठेवण्यात येणार आहे. स्मृतिसदनामध्ये अंतर्गत विद्युत रोषणाईबरोबर डिजिटल साऊंड सिस्टीम बसविण्यात आली आहे. त्यामुळे विजेचा जास्त प्रमाणात वापर होणार आहे. त्यासाठी स्मृतिसदन परिसरात विद्युत ट्रान्सफार्मर बसविण्यात यावा, याविषयी कऱ्हाड पालिकेच्या मासिक सभेत अंतिम निर्णय होणार आहे. बगीच्यामध्ये आता मुलांना बागडता येणार असल्याने नागरिकांमधून सामाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
बारा वर्षे बंद होते नूतनीकरणाचे काम
कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनच्या नूतनीकरणाचे काम हे २००३ मध्ये खऱ्या अर्थाने सुरू झाले. मात्र, २००३ पासून ते २०१५ पर्यंत बारा वर्षांत काहीच काम झाले नाही. मात्र, गेल्या वर्षभरापासूून खऱ्या अर्थाने स्मृतिसदनाच्या नूतनीकरणाच्या कामास वेग मिळाला.
यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनाला आकर्षक लूक
नूतनीकरणानंतर यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनाची इमारत आकर्षक दिसत आहे. या इमारतीत अंतर्गत भागासह बाहेरील भागातही मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. आकर्षक विद्युत रोषणाईची सुविधाही इमारतीत करण्यात आली आहे.
कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनाच्या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम वेगाने सुरू करण्यात आले आले. सध्या स्मृतिसदनाभोवताली बागेच्या डागडुजीचे काम सुरू असून, तेही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.
- प्रशांत रोेडे, मुख्याधिकारी, नगरपालिका कऱ्हाड