दक्षिण, उत्तरेत राजकीय ‘मिसळ’
By Admin | Updated: August 7, 2015 22:10 IST2015-08-07T22:10:22+5:302015-08-07T22:10:22+5:30
कऱ्हाड तालुक्यात सत्तांतराचा गुलाल : गट-तट बाजूला ठेवून अनेक गावांत बेरजेचं राजकारण --ग्रामपंचायत विश्लेषण

दक्षिण, उत्तरेत राजकीय ‘मिसळ’
प्रमोद सुकरे- कऱ्हाड -राजकीय समीकरणे सतत बदलत असणाऱ्या कऱ्हाड तालुक्यात नुकत्याच ९३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. नेत्यांप्रमाणेच स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतींसाठी सोयीने एकमेकांच्या गळ्यात गळे घातले. त्यामुळे निकालानंतरही राजकीय मिसळीमुळे ही ग्रामपंचायत अमूक एका गटाची, असे सांगणे अवघड होऊन बसले आहे. तरीही दक्षिणेत भोसले-उंडाळकर गटाने सरशी घेतल्याचे दिसते; पण आमदार पृथ्वीराज चव्हाण गटाला मिळालेले यशही दुर्लक्षित करता येण्यासारखे नाही. तर उत्तरेतही आमदार पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब पाटील समर्थकांनी हातात हात घालत काम केल्याचे स्पष्ट झाले आहे.
खरंतर राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू; अथवा मित्र नसतो. त्याचा प्रत्यय तर कऱ्हाड तालुक्यात प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळा येऊ लागला आहे. म्हणून तर विधानसभेतील पराभवानंतर भोसले-उंडाळकर गट ‘मैत्रिपर्व’ असं गोंडस बारसं घालून एकत्र आला आहे. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत या मैत्रिपर्वाला यश आल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला. त्यामुळे सहाजिकच अनेक गावांत मैत्रिपर्वाला यश मिळाले आहे.
भोसले-उंडाळकरांचे मैत्रिपर्व सर्वच गावात पचले, असे म्हणता येत नाही. कालवडेत उंडाळकर गटाच्या धनाजी थोरातांनी स्वतंत्र निवडणूक लढवित सत्ता कायम ठेवली. तर त्यांच्या विरोधात डॉ. अतुल भोसले व मदनराव मोहिते समर्थक एकत्र आले होते. बेलवडेमध्ये उंडाळकर व मदनराव मोहिते समर्थकांनी डॉ. अतुल भोसले गटाचा पराभव केला. कोळेमध्ये पृथ्वीराज चव्हाण समर्थक व डॉ. अतुल भोसले समर्थकांनी एकत्रित येऊन उंडाळकरांच्या समर्थकांचा धुव्वा उडविल दस्तुरखुद्द तालुक्याची उपराजधानी असणाऱ्या उंडाळेत तर अॅड. राजाभाऊ पाटील व अॅड. उदयसिंह पाटील यांच्या समर्थकांमध्ये लढत झाली. त्यामुळे कुणाचे किती उमेदवार अन् कुणाची किती सरशी, हे सांगताना कसरतच करावी लागते.
उत्तरेत तर आमदार बाळासाहेब पाटील व आमदार पृथ्वीराज चव्हाण समर्थकांनी अनेक गावांत हातात हात घालून काम केले, त्यामुळे त्यांना चांगलेच यश मिळाले; पण माजी आमदार उंडाळकरांच्या जुन्या गटाला बरोबर घेऊन ‘स्वाभिमानी’च्या मनोज घोरपडेंनी अनेक ग्रामपंचायतींत झेंडा फडकविला आहे. तर अनेक गावांत चांगलाच शिरकाव केला आहे. पण, निवडणुका पाहिल्यावर या विकासाच्या मुद्द्यावर किती झाल्या, हा संशोधनाचाच भाग ठरेल.
कालेत ‘दादा’गिरीला घरघर
काले गावावर भीमरावदादा पाटील यांचा गेले चार दशकांहून अधिक काळ चांगलाच दबदबा होता.
गत निवडणुकीत मात्र डॉ. अजित देसाई व सहकाऱ्यांनी विजयाचा चौकार ठोकत भीमरावदादांच्या एकहाती सत्तेला खिंडार पाडले.
गेल्या पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांनी हे सर्व सावरण्याचे प्रयत्न केले खरे; पण त्यामध्ये त्यांना अपयश आले.
यावर्षी डॉ. अजित देसाई, नाना पाटील, पांडुरंग पाटील आदींनी हातात हात घालून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कडवी झुंज दिली.
यंदा जागा दुप्पट करत आठचा आकडा गाठला, विरोधकांचे तीन उमेदवार किरकोळ मतांनी पराभूत झाले. नाही तर यंदा कालेत सत्तांतरच पाहायला मिळाले असते.
उंडाळेत कोण विजयी, कोण पराभूत ?
उंडाळे येथे यंदा प्रथमच ग्रामंपचायतीची निवडणूक झाली म्हणायची. कारण यापूर्वी निवडणूक लागायची; पण बिनविरोधच व्हायची.
यावर्षी मात्र जयसिंगराव पाटील व अॅड. राजाभाऊ पाटील यांच्या विरोधात अॅड. उदय पाटील यांच्या समर्थकांनीच पॅनेल उभं केलं.
या पॅनेलमध्ये भाऊंच्या पॅनेलने सहा तर दादांच्या पॅनेलने तीन जागा मिळविल्या. काहीजण ‘ताटात काय अन् वाटीत काय,’ अशी सारवासारव करीत आहेत.
असं असलं तरी सध्या उंडाळे ग्रामपंचायतीत कोण जिंकलं अन् कोण हरलं याची चर्चा तालुकाभर सुरू आहे.
उंडाळेच्या निवडणुकीत माजी आमदार विलासराव पाटलांनीही मतदान केले खरे; पण ते नेमके कोणत्या पॅनेलला हे अजून गुलदस्त्यातच आहे.
कऱ्हाड दक्षिणेत भोसले-उंडाळकर गटांनी अनेक ग्रामपंचायतींवर झेंडा फडकविला. कृष्णा कारखान्यात हा भोसले-उंडाळकर एकत्र आले होते.
ग्रामपंचायत निवडणुकीत भोसले-उंडाळकर या मैत्रिपर्वाची सरशी झाल्याचे मानले जाते. अनेक गावांत या गटाने अपेक्षित नसताना मुसंडी मारली आहे.
भविष्यातील अनेक राजकीय आडाखे पाहता यात उंडाळकरांची अन् भोसलेंची किती ताकद वाढली, हे पाहावे लागणार आहे.