माफ कर, हाता पाया पडतो... पण रात्री तमाशा नको रे बाबा
By Admin | Updated: May 27, 2016 22:21 IST2016-05-27T21:25:41+5:302016-05-27T22:21:32+5:30
मद्यपींचा डोलारा रस्त्यावर : विणवण्या करून कुटुंबीय बेजार

माफ कर, हाता पाया पडतो... पण रात्री तमाशा नको रे बाबा
प्रगती जाधव-पाटील -- सातारा -रात्री रस्त्यावर पथदिव्याचा लख्खं प्रकाश... रस्त्यावरून सुसाट वेगाने जाणारं एखादं चुकारीचं वाहन... आणि मध्येच ‘हालता डुलता’ मनोरा दिसला की कचकन् ब्रेक दाबून शिव्यांची लाखोली वाहत ‘कट’ मारून जाणारे वाहनचालक ... हात करूनही न थांबणारे रिक्षाचालक आणि मद्यपीला घरी नेण्यासाठी हतबल झालेले नातेवाईक... हे चित्र आहे रात्रीच्या अंधारातील..!आपल्याच तंद्रीत असणारे आणि दुनिया गेली खड्ड्यात म्हणत रस्त्यावर ठाण मांडणाऱ्या मद्यपींना विनविण्या करणाऱ्या नातेवाइकांना कोणाचाच आधार नसतो, हेच खरे. शहरातील उपगनरांमध्ये रात्री फिरताना याबाबी लक्षात आल्या. रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या आपल्या मोठ्या भावाला घरी घेऊन जाताना एका युवकाची चांगलीच भंबेरी उडाली. गाडीवर बसवावं तर ‘झुलता मनोरा’ कुठे कोसळेल याचा नेम नाही आणि रिक्षाने घरी न्यावं तर ‘कुठं हे असलं लफडं निस्तरा’ म्हणून रिक्षाचालक थांबत नाहीत. त्यामुळे मद्यपींच्या अक्षरश: हातापाया पडण्याची वेळ त्यांच्या नातेवाइकांवर येते.
घरापासून जवळच्या अंतरावर जर मद्यपीचा दंगा सुरू असेल तर लेकरांसह त्याची बायको त्याला घेण्यासाठी रस्त्यावर पोहोचते; पण वस्तीपासून दूर असेल तर लेकरांना शेजाऱ्यांच्या हवाले करून मग तिला त्यांच्या आधारानेच जावे लागते. वाट्टेल ते बोलला आणि वाट्टेल त्या शिव्या दिल्या तरी ‘कुंकवाचा धनी’ म्हणून त्याच्या शब्दांचे वार झेलत त्याची पत्नी त्याने सांगितलेले सगळे हो-हो करून त्याला घरी नेण्यासाठी प्रयत्न करत असते. तिला शेजारचे मदत करत असतात, तर हातात आईस्क्रिम घेऊन वॉकला निघालेले अनेकजण ‘शी, काय हा घाणेरडापणा आहे,’ म्हणत त्यांच्याकडे कचरा म्हणून पाहतात. तर माझा पती घरी येतोय याचे समाधान ‘ती’च्या नजरेत असते.
कितीदा सांगितलं; पण पोरगं ऐकना! -दिवसभर काम करून लई कटाळा येतुया... रात्री घरी यऊन सयपाक करून जेवायचं... हतरुनावर आंग टाकणार एवढ्यात कोणीतरी येऊन सांगतंच, मावशे तुझं पोरगं बग तिथं लई शिव्या देतुया.. आता त्याला घरी न्हाय आणलं तर लोक लई मारत्याली..! तसंच उठायचं आणि या पोराला धरून घरी आणायचा. खाऊन पिऊन इतका आडदांड झालाय की, मला तर त्यो झेपतच नाय.. मग म्या गल्लीतली पोरं घिऊन त्याच्या अड्ड्यावर येते... काय करायचं त्याला माझ्याशिवाय कुणीच न्हाय ना!’ साठीतल्या आजी सांगत होत्या आपल्या एकुलत्या एक आणि तितक्याच लाडक्या लेकाचं कर्तृत्व! तुम्ही त्याची दारू का सोडवत नाही? या आमच्या प्रश्नावर आजी जाम भडकली.‘ सगळं अंगारं लावून झालं, देवऋषी बी पालथं घातलं; पण या मेल्यावर त्याचा कायबी परिणाम हुईना. दिवसा नाही पिणार म्हणतं अन् रात्री येतं डोसून. कितीदा सांगितलं; पण मुडदा काय ऐकना कोणी तरी त्याच्यावर करणी केलीया गं... बाकी लई शाणा हाय त्यो! त्याच्या या गुणानं बायको गेली पोरास्नी घिऊन माहेराला मला न्हाय टाकता येणार त्याला यकट्याला... आपला वंशाचा दिवा हाय... मेल्यावर त्योच पाणी पाजणार!’ (आईच्या आंधळ्या मायेचा आमच्यासाठी हा साक्षात्कार होता.)
मद्यपींना आणण्यासाठी बायाबापड्या घेतात आधार
मद्यपीला वाटते आता आपणच बादशाह!