दुष्काळी तालुक्यांचे वीजबिल माफ करा

By Admin | Updated: February 25, 2016 01:14 IST2016-02-25T01:12:21+5:302016-02-25T01:14:33+5:30

नितीन बानुगडे-पाटील : युवा सेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

Sorry for the drought-hit villages | दुष्काळी तालुक्यांचे वीजबिल माफ करा

दुष्काळी तालुक्यांचे वीजबिल माफ करा

सातारा : ‘दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत. विहिरीत पाणी आहे; पण वीज कनेक्शन नसल्याने पिके करपून चालली आहेत, ही शोकांतिका आहे. आम्ही विजेची निर्मिती करायची आणि आम्हीच ती जास्त दराने खरेदी करायची, हा आमच्यावर अन्याय आहे. ज्या जिल्ह्यात वीज निर्माण होते, तेथील जनतेला ती माफक दरात मिळाली पाहिजे,’ अशी मागणी शिवसेना उपनेते व सातारा-सांगली जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी केली.
विजेच्या प्रश्नांमुळे त्रस्त झालेल्या जनतेच्या यातनांना वाचा फोडण्यासाठी सातारा जिल्हा युवा सेनेने शक्तिप्रदर्शन करत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते. यानंतर जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
बानुगडे-पाटील म्हणाले, ‘शिवसेना सरकारमध्ये असली तरी सरकारजमा झालेली नाही. शिवसेनेची बांधिलकी जनतेशी आहे, सत्तेशी नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलो आहे. कर्नाटकात वीज स्वस्त मिळत असल्याने सातारा, सांगली, कोल्हापुरातील २०० उद्योजक तिकडे आकर्षित झाले आहेत. त्यामुळे येथील औद्योगिकीकरण अडचणीत येणार असून, हजारो तरुण बेरोजगार होणार आहेत. याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडावे लागेल,’ असा खणखणीत इशारा त्यांनी यावेळी दिला.
दुपारी राजवाडा येथील गांधी मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम, नंदकुमार घाडगे, जिल्हा उपप्रमुख रामभाऊ रैनाक, राजेश कुंभारदरे, तालुकाप्रमुख हरिदास जगदाळे, प्रशांत तरडे, विकास गायकवाड, हणमंत चवरे, अण्णा देशपांडे, महेश शिंदे, अ‍ॅड. शिरीष दिवाकर, निमिश शहा, आतिश ननावरे, श्रीनिवास जाधव, बाळासाहेब शिंदे, विनायक भोसले, नितीन काशीद यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक सहभागी झाले होते.
मोती चौक, कमानी हौद, शेटे चौक, पोलीस मुख्यालय, पोवई नाकामार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला,’ ‘हा आवाज कुणाचा’, ‘अन्य राज्यांप्रमाणे स्वस्त वीज मिळालीच पाहिजे’, ‘दुष्काळग्रस्तांना वीजबिल माफ झालेच पाहिजे,’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Sorry for the drought-hit villages