वडूजमधील सोनोग्राफी मशीन जप्त

By Admin | Updated: June 11, 2014 00:57 IST2014-06-11T00:50:14+5:302014-06-11T00:57:17+5:30

शितोळेंच्या रुग्णालयालाही सील : कऱ्हाडात व्हॅनमध्ये तपासणीचा संशय

Sonography machine in Waduz seized | वडूजमधील सोनोग्राफी मशीन जप्त

वडूजमधील सोनोग्राफी मशीन जप्त

सातारा : वडूज, ता. खटाव येथील डॉ. राजेंद्र शितोळे यांनी त्यांच्या नेत्र सोनोग्राफी सेंटरमधील मशीन कऱ्हाडमध्ये नेल्याचे उघडकीस आले असून भरारी पथकाने छापा टाकून सोनोग्राफी मशीन जप्त केले. तसेच वडूज येथील रुग्णालयाला सील ठोकले असून, काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.
‘कऱ्हाड येथील शासकीय रुग्णालयासमोर एक व्हॅन उभी असून, त्या व्हॅनमध्ये सोनोग्राफी मशीन आहे,’ अशी माहिती वैद्यकीय भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकातील अधिकारी प्रकाश शिंदे, अरूणा बंडगर, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. पूनम साळुंखे यांच्यासह वडूजच्या वैद्यकीय अधीक्षक वर्षा डोईफोडे यांनी कऱ्हाडमध्ये छापा टाकला. त्यावेळी व्हॅनमध्ये सोनोग्राफी मशीन आढळून आले. ते या पथकाने जप्त केले.
डॉ. राजेंद्र शितोळे यांचे वडूज येथे नेत्र सोनोग्राफी सेंटर आहे. असे असताना त्यांनी व्हॅनमधून सोनोग्राफी मशीन कऱ्हाडमध्ये नेल्याचे भरारी पथकाला आढळून आले. सोनोग्राफी मशीन परवानगीशिवाय दुसरीकडे नेणे कायद्याने गुन्हा आहे; त्यामुळे भरारी पथकाने वडूज येथील नेत्र सेंटरही सील केले आहे. तसेच या सेंटरमधून काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. डॉ. राजेंद्र शितोळे यांच्यावर कऱ्हाडमधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. (प्रतिनिधी)

Web Title: Sonography machine in Waduz seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.