भुर्इंजचा सुपुत्र भारत-केनियातील संपर्क दूत
By Admin | Updated: July 15, 2016 22:55 IST2016-07-15T21:49:45+5:302016-07-15T22:55:38+5:30
जिल्ह्याला अभिमान : पंतप्रधानांच्या केनिया दौऱ्यात राजेश स्वामी यांची कामगिरी

भुर्इंजचा सुपुत्र भारत-केनियातील संपर्क दूत
भुर्इंज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत विविध परदेश दौऱ्यात सहभागी होऊन आतापर्यंत श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया, जपान आदी देशांमध्ये गेलेल्या शिष्टमंडळात विशेष जबाबदारी पार पाडणारे भारतीय विदेश अधिकारी तथा केनियातील भारताचे डेप्यूटी हाय कमिशनर राजेश स्वामी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या दोन दिवसांच्या केनिया दौऱ्यात भारत आणि केनिया या दोन देशांमधील मुख्य संपर्क अधिकारी म्हणून यशस्वी कामगिरी बजावली.
भुर्इंज, ता. वाई गावचे सुपुत्र असणारे राजेश स्वामी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे परराष्ट्र सेवेत दाखल झाले आहेत. परराष्ट्र मंत्रालय दिल्ली, इजिप्त, थायलंड येथे सेवा बजावल्यांनतर ते केनियातील भारतीय राजदूतावासात डेप्यूटी हाय कमिशनर म्हणून आहेत.
दि. १० व ११ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी केनियाच्या दौऱ्यावर गेले होते. पंतप्रधानांचा हा दौरा यशस्वी पार पाडण्यासाठी या दौऱ्यामध्ये भारत आणि केनिया या दोन्ही राष्ट्रांमधील मुख्य संपर्क अधिकारी म्हणून राजेश स्वामी यांनी यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली. पंतप्रधानांनी या दौऱ्यात केनियाचे राष्ट्राध्यक्ष उहूरू केन्याटा यांच्यासमवेत चर्चा करून सात सामंजस्य करारावर सह्या केल्या. केनियात कॅन्सर सेंटर स्थापन करण्याचे जाहीर केले, केनियाची राजधानी असलेल्या नैरोबी युनिव्हर्सिटीत भाषण केले. केनियातील भारतीयांशी संवाद साधला. भारत-केनिया बिझनेस फोरमला भेट दिली आणि तेथे त्यांनी मार्गदर्शनही केले. केनिया आणि भारत या देशांमधील संबंधांना उजाळा देऊन केनियामध्ये कृषी, ऊर्जा, वस्त्रोद्योग क्षेत्रात गुंतवणूक करण्यास भारत उत्सुक असल्याचे सांगितले. स्वामी यांच्या पंतप्रधानां समवेतच्या परराष्ट्र कामगिरीबद्दल परिसरात आनंद व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
शिष्टमंडळातही सहभाग
व्यस्त वेळापत्रकातील प्रत्येक कार्यक्रमात राजेश स्वामी यांनी पंतप्रधानांसोबत सहभाग घेऊन दोन्ही देशांमध्ये मुख्य संपर्क अधिकारी म्हणून आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजेश स्वामी यांना श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया, जपान आदी देशांच्या दौऱ्यातील शिष्टमंडळात सहभागी करून घेतले होते.
केनियाची राजधानी नैरोबी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करताना केनियातील भारताचे डेप्यूटी हाय कमिशनर राजेश स्वामी.