संघाचे नि:स्वार्थी कार्य रोखण्यासाठी काहींचा खटाटोप : पावसकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:41 IST2021-05-12T04:41:02+5:302021-05-12T04:41:02+5:30
सातारा : काही राजकीय पुढारी संघाची बदनामी करायचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. नागरिकांशी वाद झाल्याचा बनाव करून निःस्वार्थी सेवाकार्य ...

संघाचे नि:स्वार्थी कार्य रोखण्यासाठी काहींचा खटाटोप : पावसकर
सातारा : काही राजकीय पुढारी संघाची बदनामी करायचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. नागरिकांशी वाद झाल्याचा बनाव करून निःस्वार्थी सेवाकार्य थांबवण्याच्या उद्देशाने संघाला टार्गेट करायचा प्रकार आहे, अशा लोक पुढाऱ्यांनी भूमिगत होऊन बसण्यापेक्षा कोरोना विरोधात लढायला पुढे यावे असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केले आहे.
पावसकर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गतवर्षी मार्चपासून देशात कोरोनाचा प्रभाव वाढू लागला होता. अशा परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करायच्या उद्देशाने सबंध भारतभर संघ स्वयंसेवक रस्त्यावर मदतीकरिता रस्त्यावर उतरले होते. पहिल्या लाटेत राज्यातील कोरोना हॉटस्पॉट म्हणून गणल्या जाणाऱ्या धारावी तसेच पुणे यासारख्या ठिकाणी संघ स्वयंसेवक स्वतः प्राणांची पर्वा न करता स्वयंस्फूर्तीने टेस्टिंग, ट्रेसिंग करत होते. यादरम्यान कित्येक स्वयंसेवकांना प्राणासदेखील मुकावे लागले. अशा परिस्थितीत कराडसारख्या ठिकाणी देखील स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाची रीतसर परवानगी घेऊन लसीकरण केंद्रावर ३ दिवस झाले स्वयंसेवक रुग्णालय प्रशासनाला मदत करत आहेत. संघ स्वयंसेवक स्वतःच जीव धोक्यात घालून गर्दी नियंत्रण, नाव नोंदणी, ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य यांसारख्या कार्यात प्रशासनास मदत करत आहेत. नागरिकदेखील या निःस्वार्थी कार्याची मुक्तकंठाने स्तुती करत आहेत.
वास्तविक ज्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय आपत्तीवेळी सहकार्याच्या ऐवजी भूमिगत झाले अशा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून दुसऱ्या काय अपेक्षा करणार? कोरोना काळात जनसेवेसाठी रस्त्यावर उतरण्याऐवजी घराचे दरवाजे बंद करणाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता निःस्वार्थी काय करणाऱ्या संघाच्या कार्यावर आक्षेप म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. तक्रार करून कार्य बंद पाडण्याचा हेतू साध्य करणाऱ्यांनी आज कॉटेजला भेट देऊन नियोजनाअभावी झालेली दुरवस्था नक्कीच पाहावी. सोशल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा, लसीकरण केंद्रावरचा सावळागोंधळ नजरेखालून आवर्जून घालावा.