लोकशाहीसाठी ‘कुछ दाग अच्छे होते है...!’
By Admin | Updated: October 16, 2014 00:08 IST2014-10-15T23:00:36+5:302014-10-16T00:08:22+5:30
सोशल मीडियावर फिरत होते संदेश : जनजागृतीतही पुढाकार

लोकशाहीसाठी ‘कुछ दाग अच्छे होते है...!’
सातारा : ‘विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत व्हॉट्स अॅप, फेसबुक आदी सोशल मीडियावर प्रचाराचे रणकंदन माजले होते. मिनिटाला डझनावरी प्रचाराचे फोटो, क्षणचित्रे, क्लिप पडत होते. सोमवारी सायंकाळी सहाला प्रचार थांबला अन् त्याच सोशल मीडियाला काही काळ ‘ब्रेक’ लागला. त्यानंतर तासाभरानंतर लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान आवश्यक आहे. ‘कोणालाही मत द्या; पण अधिकार बजावा,’ असे संदेश फिरू लागले होते.
विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी सहाला थंडावल्या. त्यानंतर व्हॉट्स अॅपवरील अनेक गु्रपवर ही आठवण करून देणारे, ‘राजकीय मजकूर टाकले तर संबंधित व्यक्तींवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो,’ या आशयाचे संदेश पडले. त्यामुळे पंधरा दिवस ‘टिंव्ह-टिंव्ह’ करणारे मोबाईलही काही काळ थंडावले. त्यानंतर मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी, मतदारांना मतदानासाठी घरातून बाहेर पाडण्यासाठी प्रवृत्त करणारे राष्ट्रीय कर्तव्यात याच मीडियाने पुढाकार घेतला.
मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले जात होते. विविध मार्गाने जनजागृती केली जात होती. गेल्या पंधरा दिवसांत केवळ आणि केवळ प्रचारासाठी वापर झालेल्या सोशल मीडियावरून मतदानासाठी प्रवृत्त करणारे संदेश फिरू लागले. यामध्ये ‘मतदान कोणालाही करा; पण आपले कर्तव्य पार पाडण्यात मागे राहू नका,’ हा मतितार्थ होता.
‘मतदानकार्डचा वापर केवळ मोबाईल सीमाकार्ड खरेदीसाठी करू नका, मतदान करा...’ असा संदेश एकाने पाठविला आहे. आणखी एक पोस्ट सर्वाधिक फिरत होती. त्यामध्ये उमेदवाराने दिलेल्या पैशात दोन दिवसांचं खाणं भागलं; पण तो जिंकला तर पाच वर्षे जनतेला खाणार, त्याचं काय? आपलं मत अमूल्य आहे. ते योग्य उमेदवारास द्या...’ गरीब शेतकऱ्याचा फोटो असलेली ही पोस्ट मतदारांना जागेवर आणणारी आहे.
आणखी एका पोस्टमध्ये लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्वांनीच मतदान करायला हवे; पण त्यातूनही खासगी क्षेत्रात कार्यरत असलेल्यांनी मतदानाचा हक्क बजावण्याची आवश्यकता का आहे?, हे पटवून सांगितले जात आहे. शासकीय व खासगी क्षेत्रातील नोकरीतील तफावत सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
स्वच्छ प्रतिमेला महत्त्व आहे. आपल्या चारित्र्याला कोणताही बट्टा लागणार नाही, यासाठी प्रयत्न व्हावेत; पण रात्रंदिवस धडपडणारी मतदान यंत्रणा अन् लोकशाहीला तुमचे मतदान अपेक्षित आहे. तो तुमचा अधिकार नसून कर्तव्य आहे. त्यामुळे मतदानानंतर बोटावर लावलेला शाईचा डाग चांगला आहे...’ हा संदेशही लोकांना आकर्षित करत आहे. सोशल मिडियावरील या परिस्थितीमुळे जिल्ह्याचे राजकीय वातावरण भलतेच ढवळून निघाले होते. (प्रतिनिधी)
टिक-टिक वाजते डोक्यात
‘फॅण्ड्री’मधील प्रेम कहाणीच्या धर्तीवर तरुण-तरुणीची एक छोटी चित्रफीत तयार केली आहे. त्यामध्ये तरुण धाडस करून तरुणीला चिठ्ठी देऊन निघून जातो. ती चिठ्ठी काय आहे, हे उत्सुकतेने पाहते तर त्यावर संदेश दिलेला आहे. ‘आठवणीनं मतदान करा, धन्यवाद...’ ही चित्रफीत तरुणांना खास आकर्षित करत आहे. तसेच कार्टूनवरही गाणे आले आहे.
यंदा कर्तव्य आहे...
दिवाळी झाली की लग्नाचा हंगाम सुरू होतो. त्यामुळे अनेक लग्नघरातून लग्नपत्रिका छापण्यास टाकल्या आहेत. हाच धागा पकडून एका तरुणाने ‘यंदा कर्तव्य आहे.’ ही पोस्ट डिझाईन केली आहे. त्यावर मतदार आणि लोकशाहीचा विवाह सोहळा १५ आॅक्टोबरला होत आहे. त्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करत असतानाच कोणताही आहेर स्वीकारू नये, अशी टीप दिली आहे.