माण तालुक्यात कही खुशी.. कही गम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:17 IST2021-02-05T09:17:59+5:302021-02-05T09:17:59+5:30

माण तालुक्यात शुक्रवारी झालेल्या ग्रामपंचायत सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीमध्ये एकूण ९५ ग्रामपंचायतींच्या सोडती झाल्या. या निवडीमुळे कही खुशी.. कही गम ...

Some happiness in Maan taluka .. some sorrow | माण तालुक्यात कही खुशी.. कही गम

माण तालुक्यात कही खुशी.. कही गम

माण तालुक्यात शुक्रवारी झालेल्या ग्रामपंचायत सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीमध्ये एकूण ९५ ग्रामपंचायतींच्या सोडती झाल्या. या निवडीमुळे कही खुशी.. कही गम दिसून आला.

नुकत्याच झालेल्या ६१ व भविष्यात होणाऱ्या ३४ अशा ९५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या सोडती झाल्या. तालुक्यात सर्वसाधारण पुरुष २८, सर्वसाधारण महिला २९, नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष १३ व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला १३ तर अनुसूचित जाती ६ पुरुष व ६ महिला अशी सोडत काढण्यात आली. या सोडतीमुळे अनेकांचे मनसुबे धुळीस मिळाले तर अनेकांना आरक्षणाची लॉटरी लागली आहे.

माण तालुक्यातील प्रमुख ग्रामपंचायतींमध्ये लोधवडे येथील आरक्षण खुले असून, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख जे सांगतील त्यांनाच संधी मिळणार आहे. गोंदवले येथे संजय माने हे पाचवी टर्म निवडून आले असून, त्यांनी सरपंच, उपसरपंचपदी काम केलेले आहे. त्यांना संधी मिळतेय का ते पहावे लागेल. कुकडवाडमध्ये संजय जाधव हेच प्रमुख दावेदार आहेत. तर देवापूर येथे शहाजी बाबर व तात्यासाहेब औताडे या दोघांना संधी उपलब्ध झाली असून, या ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी युती होती. दोघांनाही संधी दिली जाणार आहे. मार्डी, राणंद या ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग असल्याने येथे अनेकजण इच्छुक आहेत. शेवरीमध्ये महिला खुले आरक्षण असल्याने मुळीक यांना सरपंचपद मिळणार का ते पहावे लागणार आहे. बिदालमध्ये आरक्षण खुले झाल्याने भविष्यात मोठी चुरस पहायला मिळणार आहे.

पिंगळी बुद्रुक येथे पिंगळीमध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षण पडल्याने श्रीकांत जगदाळे यांना सरपंच पदासाठी पुढील टर्म वाट पहावी लागणार आहे. वावरहिरे सरपंचपद सर्वसाधारण महिला असल्याने विद्यमान सरपंच चंद्रकांत वाघ यांना सरपंचपद घरात ठेवण्याची संधी आहे. दानवलेवाडीतील सर्वेसर्वा रमेश कदम आपल्या पत्नी जयश्री कदम यांना सरपंच करण्यासाठी प्रयत्न करू शकतात. मलवडीमध्ये पुन्हा विद्यमान सरपंच दादा जगदाळे घरातील व्यक्तीला सरपंच करू शकतात. आंधळीमध्ये जिल्हा परिषद सदस्य बाबासो पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन काळे, दादासाहेब काळे या तिघांनाही सरपंचपदाची नामी संधी असून, तिघेही यापूर्वी सरपंच राहिले आहेत. जिल्हा परिषद सदस्यही होते. त्यामुळे पुन्हा ग्रामपंचायतीवर येणार का ते बघावे लागेल. वारुगडमध्ये अनेकवर्षे राजकारणात असलेल्या दिलीप कदम यांना आरक्षणाने हुलकावणी दिली आहे. येथे अनुसूचित जातीचे आरक्षण पडले असून, उमेदवारच नाही तर किरकसालमध्ये सर्वच जागा एक हाती निवडून आणलेल्या अमोल काटकर यांना उपसरपंच पदावर समाधान मानावे लागणार आहे. येथे इतर मागास प्रवर्ग महिला आरक्षण पडले आहे तर अटीतटीच्या लढतीत कुळकजाईमध्ये निवडून आलेल्या विक्रम जगताप यांना संधी प्राप्त झाली आहे.

चौकट..

सरपंचपद रिक्त की सोडत लागणार?

वारुगड येथे अनुसूचित पुरुष पिंगळी बुद्रुक, परकंदी, खडकी, बोथे येथे अनुसूचित महिला असे सरपंच आरक्षण पडले असून, या ठिकाणी सदस्यच निवडून आला नसल्याने येथील सरपंचपद रिक्त राहणार की सोडत घेतली जाणार, याबाबत संभ्रम आहे.

Web Title: Some happiness in Maan taluka .. some sorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.