कोरेगाव : राज्य सहकारी बँक आणि जरंडेश्वर साखर कारखाना या विषयात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लक्ष घातले आहे. कारखान्याशी संबंधित लोकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. शनिवार, दि. ११ सप्टेंबर रोजी मुंबईत मुलुंड येथे किरीट सोमय्या यांची जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने भेट घेतली व कारखान्याविषयी प्रदीर्घ चर्चा केली.
किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात मोठी मोहीम उघडली असून, अनेक मंत्र्यांवर ते आरोप करत आहेत. गेल्या आठवड्यात पुण्यात त्यांनी जरंडेश्वर कारखान्याच्या विषयावर पत्रकार परिषद घेऊन आरोप केले होते.
जरंडेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीरंग सापते, संचालक शंकरराव भोसले-पाटील, पोपटराव जगदाळे व कार्यकारी संचालक किसनराव घाडगे यांनी सोमय्या यांच्याशी कारखान्याविषयी चर्चा केली.
चौकट :
बारकाईने घेतली माहिती...
पुढच्या आठवड्यात मी स्वतः चिमणगावमध्ये जरंडेश्वर कारखान्यावर येणार असून, तेथील पाहणी करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. संचालक मंडळाने पाहणीवेळी उपस्थित राहावे आणि वस्तुस्थिती निदर्शनास आणून द्यावी, अशी विनंती सोमय्या यांनी केली. कारखान्याविषयी सुरू असलेल्या विविध खटल्यांची आणि ईडीच्या कारवाईची सोमय्या यांनी बारकाईने माहिती घेतली.