मातंग समाजाचे विविध प्रश्न सोडवू -साठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:41 IST2021-02-09T04:41:48+5:302021-02-09T04:41:48+5:30
सातारा : ‘मातंग समाजाला राजकारणाच्या प्रवाहात आणणे आणि त्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लवकरच पश्चिम महाराष्ट्रात रिपाइं मातंग आघाडीच्या ...

मातंग समाजाचे विविध प्रश्न सोडवू -साठे
सातारा : ‘मातंग समाजाला राजकारणाच्या प्रवाहात आणणे आणि त्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लवकरच पश्चिम महाराष्ट्रात रिपाइं मातंग आघाडीच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे,’ अशी माहिती रिपाइंचे (आठवले गट) मातंग आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष हनुमंत साठे यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत साठे बोलत होते. यावेळी ‘रिपाइं’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, पश्चिम महाराष्ट्र सचिव रूपा वायदंडे, मातंग आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र संघटक रघुनाथ बाबर, ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, मातंग आघाडी उपाध्यक्ष अण्णा वायदंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
हनुमंत साठे म्हणाले, ‘रिपाइं’चे नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याशी चर्चा करून महामेळाव्याचे ठिकाणी आणि तारीख जाहीर करण्यात येईल. या महामेळाव्याच्या माध्यमातून मातंग समाजाच्या विविध मागण्यांचे ठराव करण्यात येणार आहेत. तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त २०२० मध्ये एकही कार्यक्रम झालेला नाही. यावर्षी कार्यक्रम होण्यासाठी शासनाने १०० कोटींची तरतूद करावी अशी मागणी करणार आहोत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला ७ वर्षांत निधीची तरतूद नाही. हा निधी तातडीने मिळावा. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, यासाठी मातंग आघाडीचे एक शिष्टमंडळ लवकरच पंतप्रधानांना भेटणार आहे.
यावेळी रिपाइं (आठवले गट) मातंग आघाडीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र किशोर गालफाडे यांना प्रदान करण्यात आले. तसेच इतर काही पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
..............................................................